World Test Championship :अरुंडेल (ससेक्स) : जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ टप्प्याटप्प्याने इंग्लंडमध्ये दाखल झाला असून, सोमवारी विराट कोहलीने भारतीय संघासोबत सराव केला. खांद्याच्या दुखापतीतून बरा झालेल्या जयदेव उनाडकटनेही सरावात सहभाग घेतला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत संघांदरम्यान ७ ते ११ जूनदरम्यान ओव्हल येथे होणार आहे. या सामन्यासाठी ‘आयपीएल’मधून आटोपते घेत भारतीय खेळाडू टप्प्याटप्प्याने इंग्लंडला दाखल झाले आहेत. कर्णधार रोहित शर्मा यशस्वी जैस्वालसह सोमवारी येथे दाखल झाला. मात्र, तो मंगळवारपासून सरावात सहभागी होईल. उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे दोघे सर्वात आधी इंग्लंडमध्ये दाखल झाले. भारतीय खेळाडूंच्या सरावाचे छायाचित्र ‘ट्वीट’ करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या सरावास सुरुवात झाल्याची माहिती दिली.




विराट कोहली, उमेश यादव, मोहम्मद सिराज, फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट हे खेळाडू सरावात गर्क होते. ससेक्सकडून कौंटी क्रिकेट खेळणारा चेतेश्वर पुजारादेखील भारतीय संघासोबत आला आहे. खांद्याच्या दुखापतीतून बरा झालेल्या उनाडकटने सरावादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांच्याशी चर्चा केली.
‘आयपीएल’ची अंतिम लढत पावसामुळे पुढे ढकलली गेल्याने रवींद्र जडेजा, शुभमन गिल, मोहम्मद शमी, के.एस. भरत, अजिंक्य रहाणे यांचे इंग्लंडमध्ये येणे लांबले आहे. हा सामना ‘आयसीसी’च्या स्पर्धेचा भाग असल्यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळावर दोन्ही संघांसाठी सराव सामना ठेवण्याचे बंधन नाही.