scorecardresearch

World Test Championship: दोघांचा सामना तिसऱ्याचा लाभ! द. आफ्रिकेचा पराभव, भारताला फायदा; दुसऱ्या स्थानी झेप, पाहा Points Table

World Test Championship Points Table India: भारताने बांगलादेशचा १८८ धावांनी उडवला धुव्वा

World Test Championship: दोघांचा सामना तिसऱ्याचा लाभ! द. आफ्रिकेचा पराभव, भारताला फायदा; दुसऱ्या स्थानी झेप, पाहा Points Table
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताला फायदा (फोटो सौजन्य – रॉयटर्स, एपी)

World Test Championship Points Table India: रविवारी एकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष कतारमधील अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्सदरम्यानच्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागलं होतं. मात्र दुसरीकडे आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेमध्ये भारताने थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताने बांगलादेशला १८८ धावांनी धूळ चारल्याने तसेच ब्रिस्बेनच्या मैदानावर पूर्णपणे गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने रविवारी दुसऱ्याच दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळवल्याने क्रमवारीत हा बदल झाला आहे. केवळ दोन दिवसांतच दोन्ही संघांचे मिळून तब्बल ३४ फलंदाज गारद झाले. द. आफ्रिकन संघ १५२ आणि ९९ धावांवर बाद झाला. चार संघाच्या या कामगिरीमुळे आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत मोठे फेरफार घडलेत.

विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांआधी भारत या गुणतालिकेमध्ये चौथ्या तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी होता. मात्र पाचच दिवसांमध्ये हे चित्र पालटलं असून भारताने आता दोन स्थानांनी झेप घेतली आहे. दोन अव्वल संघ या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलियन संघ या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी आहे. ७६.८२ टक्क्यांसहीत ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान कायम राखलं आहे. १३ पैकी ९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे.

भारत सध्या ५५.७७ टक्क्यांसहीत दुसऱ्या स्थानी आहे. भारताने १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव झाल्याने त्यांची क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची टक्केवारी ५४.५५ इतकी आहे. श्रीलंकेची या गुणतालिकेमध्ये एका स्थानेने घसरण झाली असून ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत. त्यांच्या विजयाची टक्केवारी ५३.३३ इतकी आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान सध्या कराचीमधील नॅशनल स्टेडियमवर तिसऱ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटीसाठी घाम गाळत आहेत. इंग्लंड पाचव्या स्थानी आहे. ४४.४४ टक्क्यांसहीत इंग्लंड पाचव्या स्थानी असून त्या खालोखाल ४२.४२ टक्क्यांसहीत पाकिस्तान आहे. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत २-० ने अजेय आघाडी घेतली आहे. रावळपिंडी आणि मुल्तान कसोटी सामना इंग्लंडने जिंकला आहे.

सातव्या स्थानावर वेस्ट इंडिजचा (४०.९१ टक्के) संघ आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकणार न्यूझीलंडचा (२५.९३) संघ आठव्या स्थानी आहे तर बांगलादेशचा संघ (१२.१२ टक्क्यांसहीत) तळाशी म्हणजेच ९ व्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 17:10 IST

संबंधित बातम्या