मानांकित खेळाडूंसाठी यंदाची अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा पराभवाचा धक्का देणारी ठरली आहे. त्याला सोमवारही अपवाद राहिला नाही. कॅरोलीन वोझ्नियाकी हिने पाचव्या मानांकित मारिया शारापोव्हाला गारद केले, तर पुरुषांमध्ये चौथ्या मानांकित डेव्हिड फेरर याला गिलेस सिमोन याने पराभवाची चव चाखावयास दिली.
महिलांमध्ये पहिल्या आठ मानांकित खेळाडूंपैकी अग्रमानांकित सेरेना विल्यम्स व सातवी मानांकित एवगेनी बुचार्ड यांचा अपवाद वगळता अन्य सर्व खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. वोझ्नियाकी या दहाव्या मानांकित खेळाडूने माजी विजेती शारापोव्हा हिला ६-४, २-६, ६-२ असे हरविले. शारापोव्हा हिने येथे २००६मध्ये विजेतेपद मिळविले होते. कडक ऊन व सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस अशा संमिश्र हवामानात शारापोव्हा हिला अपेक्षेइतके वर्चस्व दाखवता आले नाही. तिने जून महिन्यात फ्रेंच खुली स्पर्धा जिंकली होती. मात्र येथे तिने ४३ वेळा अक्षम्य चुका केल्या तसेच आठ वेळा दुहेरी चुका करीत सामन्यावरील नियंत्रण गमावले. त्याचा फायदा घेत वोझ्निायाकी हिने आश्चर्यजनक विजयाची नोंद केली.
वोझ्निायाकी हिला उपांत्यपूर्व फेरीत १३वी मानांकित सारा इराणी हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. इटलीच्या सारा हिने ३२ वर्षीय खेळाडू मिर्जाना ल्युसिक बरोनी हिच्यावर ६-३, २-६, ६-० असा विजय मिळविला होता. मिर्जाना हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविले होते.
स्पॅनिश खेळाडू फेरर याला सिमोन याने ६-३, ३-६, ६-१, ६-३ असे पराभूत केले. फेरर याने केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेत सिमोन याने हा विजय मिळविला. सिमोन याची क्रोएशियाच्या मरीन सिलिक याच्याशी गाठ पडणार आहे. सिलिक याने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसन याचा ६-३, ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत बोपण्णाची आगेकूच
भारताच्या रोहन बोपण्णा याने स्लोवाकियाच्या कॅटरिना श्रेबोत्निक हिच्या साथीत मिश्र दुहेरीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली. या जोडीने अ‍ॅनाबेल मेदिना गॅरिग्ज (स्पेन) व राव्हेन क्लासेन (दक्षिण आफ्रिका) यांचा ६-३, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा व श्रेबोत्निक यांना सानिया मिर्झा (भारत) व ब्रुनो सोरेझ (ब्राझील) यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.