Delhi Capitals vs Mumbai Indians, WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील १३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून नेट सिव्हर ब्रंटने नाबाद ६५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर तिने संघाची धावसंख्या ५ गडी बाद १५४ धावा केल्या. १५५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला चांगली सुरूवात मिळाली. शफाली वर्माने २४ चेंडूत २९ धावा केल्या. तर लिजेल ली ने २८ चेंडूत ४६ धावा केल्या. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. त्यानंतर लॉरा वॉल्डवॉर्ट आणि आणि जेमिमा रॉड्रिग्जने मिळून डाव सांभाळला. पण १७ व्या षटकात जेमिमाने गोलंदाजाच्या दिशेने वेगवान फटका मारला, जो चेंडू जाऊन थेट यष्टीला लागला. त्यामुळे तिला १७ धावांवर बाद होऊन माघारी परतावं लागलं. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने दिल्लीसाठी महत्वपूर्ण धावा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
मुंबईने ठेवलं १५५ धावांचं आव्हान
या सामन्यात मुंबई इंडियन्सला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं.मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेली सजीवन सजना आणि हेली मॅथ्यूजची जोडी स्वस्तात माघारी परतली. सजीवन सजना अवघ्या ९ हेली मॅथ्यूज अवघ्या १२ धावा करत माघारी परतली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली नेट सिव्हर ब्रंट शेवटपर्यंत उभी राहिली. तिने ४५ चेंडूंचा सामना करत ६५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ६ चौकार आणि २ षटकार खेचले.
तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंचा सामना करत ४१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ७ चौकार खेचले. तर निकोला कॅरीने १२ धावा केल्या. शेवटी संस्कृती गुप्ताने नाबाद १० धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ५ गडी बाद १५४ धावांवर पोहोचवली.
