वुमन्स प्रीमियर लीग २०२६ च्या सामन्यांना ६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. बीसीसीआयने आज म्हणजेच २९ नोव्हेंबरला स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. WPLसाठी महालिलाव काही दिवसांपूर्वीच पार पडला. या लिलावात अनेक संघातील खेळाडू बदलले आहेत. या लिलावात १६ वर्षीय खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात सामील केलं आहे.
WPL मेगा लिलावात एकूण पाच संघांनी ६७ खेळाडूंसाठी बोली लावली. या यादीत दिया यादव हिचे नावही होते. दिया यादव ही १६ वर्षांची आहे. ती दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाली आहे, या संघात आधीच शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज सारख्या जागतिक स्तरावरील उत्कृष्ट भारतीय फलंदाजांचा समावेश आहे.
१६ वर्षीय दिया शफाली वर्माला तिचा आदर्श मानते. तिने हरियाणाकडून शेफालीबरोबर क्रिकेट खेळलं आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये शफालीने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर होण्याचा मान पटकावला.
दिया यादव शफाली वर्माला मानते आदर्श
दिल्ली कॅपिटल्सने १० लाख रुपयांच्या मूळ किमतीला टॉप-ऑर्डर आक्रमक फलंदाज दिया यादव हिला खरेदी केलं. १६ वर्षीय दिया यादव ही WPL मेगा लिलावात खरेदी होणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. दिल्ली कॅपिटल्सने निवड केल्याबद्दल दिया यादवचं तिची आदर्श असलेल्या शफाली वर्माने फोटो पोस्ट करत अभिनंदन केलं. दिया गेली तीन वर्षे शफालीबरोबर खेळली आहे.
दिया यादव शफाली वर्माप्रमाणेच आक्रमक फलंदाज आहे. १५ वर्षांखालील महिला एकदिवसीय कपमध्ये त्रिपुराविरुद्ध १२५ चेंडूत २१३ धावांची धमाकेदार खेळी करून दियाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळीनंतर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिया म्हणाली की, आधी तिला कोणीही ओळखत नव्हते. ही खेळी तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट होती.
“आम्ही हरियाणाकडून एकत्र खेळलो आहोत. फलंदाजी करताना आक्रमक फटके कसे खेळायचे आणि दबावाच्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे मी नेहमीच शिकत असते. ती (शफाली) दबावात खरोखर चांगली खेळते. जेव्हा मी तिच्याबरोबर खेळायला सुरुवात केली तेव्हा मी मोठे फटकेबाजी करण्याचा सराव सुरू केला होता.” दिया द इंडियन एक्सप्रेसला म्हणाली.
२०२५ च्या सिनियर महिला टी-२० ट्रॉफीमध्ये, शफाली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती, तर दिया हरियाणासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. तिने सहा डावांमध्ये २९८ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ सुनील गुप्ता यांनी सांगितलं केला की, ते दियावर तिच्या १५ वर्षांखालील संघात असल्यापासून लक्ष ठेवून होते.
