वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात झंझावाती फॉर्मात असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजयरथ अखेर दिल्ली कॅपिटल्स संघाने रोखला. पाचपैकी पाचही सामने जिंकणाऱ्या बंगळुरू संघाला दिल्लीने चीतपट केलं. बडोद्याच्या कोटंबी स्टेडियमवर झालेल्या मुकाबल्यात बंगळुरूला १०९ धावाच करता आल्या. दिल्लीने ७ विकेट्स आणि २६ चेंडू राखून दिमाखदार विजय मिळवला.
ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधना यांनी बंगळुरूला ३६ धावांची सलामी दिली. मॅरिझान कापने हॅरिसला बाद करत ही जोडी फोडली. तिने ९ धावा केल्या. स्मृतीने जॉर्जिआ वॉलच्या साथीने धावफलक हलता ठेवला. मिनू मामीने स्मृतीला बाद करत बंगळुरूला धक्का दिला. स्मृतीने ३४ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावांची खेळी केली. श्री चरणीने गौतमी नाईकला तंबूत परतावलं. कापने वॉलला त्रिफळाचीत केलं. तिने ११ धावा केल्या. ऋचा घोष, नादिन डी क्लार्क यांच्याकडून बंगळुरूला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र मनीने ऋचाला तर हेन्रीने क्लार्कला बाद केलं. राधा यादवने १८ धावांची खेळी करत प्रतिकार केला. बंगळुरूच्या तळाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीतर्फे नंदिनी शर्मान ३ तर चिन्ले हेन्री, मॅरिझान काप आणि मिनू मानी यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. सायली सतघरेने वादळी खेळीसाठी प्रसिद्ध शफाली वर्माला माघारी धाडलं. तिने १६ धावा केल्या. भरवशाच्या लिझेल ली हिलाही सायलीनेच तंबूत धाडलं. मात्र यानंतर अनुभवी लॉरा वॉल्व्हडार्ट आणि कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. राधाने जेमिमाला बाद करत ही जोडी फोडली. जेमिमाने २४ धावा केल्या. जेमिमा बाद झाल्यानंतर लॉराने सूत्रं हाती घेत संयमी खेळी साकारत दिल्लीला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. तिने ३८ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४२ धावांची खेळी केली. अनुभवी मॅरिझान कापने १५ चेंडूत १९ धावा करत तिला चांगली साथ दिली.
या विजयासह दिल्लीचे ६ सामन्यात ६ गुण झाले आहेत. त्यांनी ३ सामने जिंकले तर ३ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत त्यांनी दुसऱ्या स्थानी आगेकूच केली आहे.
