UP Warriorz vs Gujarat Giants: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १४ वा सामना गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात जायंट्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८ गडी बाद १५३ धावा केल्या होत्या. गुजरात जायंट्कडून पहिल्या डावात फलंदाजी करताना अनुभवी फलंदाज सोफी डिवाईनने नाबाद ५० धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना यूपीचा संपूर्ण डाव अवघ्या १०८ धावांवर आटोपला.
या सामन्यात यूपी वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सकडून सलामीला आलेल्या बेथ मुनीने ३४ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. तर डॅनियल वॅटने ८ चेंडूत अवघ्या १४ धावा केल्या. तर अनुष्का शर्माने देखील ८ चेंडूत १४ धावा केल्या. कर्णधार ॲशले गार्डनर या डावात स्वस्तात माघारी परतली. तिने अवघ्या ५ धावा केल्या. गुजरात जायंट्सचा डाव अडचणीत असताना सोफी डिवाईनने डाव सांभाळला. तिने ४२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने नाबाद ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरात जायंट्सने ८ गडी बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली.
हा सामना जिंकण्यासाठी यूपी वॉरियर्सला १५४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना किरण नवगिरे शून्यावर माघारी परतली. त्यानंतर मेग लेनिंग देखील अवघ्या १४ धावांवर माघारी परतली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फिबी लिचफिल्डने २७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. पण तिला इतर कुठल्याही फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. हरलिन देओल अवघ्या ३ धावांवर माघारी परतली. यूपी वॉरियर्सला हा सामना जिंकण्याची संधी होती. पण कुठलीही फलंदाज मैदानावर टिकून राहू शकली नाही.
त्यामुळे यूपीवॉरियर्सचा डाव अवघ्या १०८ धावांवर आटोपला. हा सामना गुजरात जायंट्सने ४५ धावांनी आपल्या नावावर केला. गुजरात जायंट्सने या स्पर्धेत ६ सामने खेळले आहेत. यापैकी हा तिसरा विजय आहे. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर यूपी वॉरियर्सने देखील या स्पर्धेत ६ सामने खेळले आहेत. यापैकी केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर उर्वरीत ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
