WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला. पण दिल्लीच्या खेळाडूने मन जिंकलं. दिल्ली कॅपिटल्स संघाची यष्टिरक्षक लिजेल लीने यष्टीमागे डाइव्ह मारून भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. मुंबईची सलामीवीर फलंदाज अमेलिया केर स्ट्राईकवर असताना दुसरे षटक टाकण्यासाठी शिनेल हेनरी गोलंदाजीला आली. या षटकातील पहिलाच चेंडू तिने फुल लेंथवर टाकला. जो बॅटचा कडा घेऊन मागे गेला.

हा चेंडू स्लिपमध्ये चालला होता. पण लिजेल लीने उजव्या बाजूला झेप घेतली आणि भन्नाट झेल घेतला. आधी हा झेल सुटला होता. पण तिने पडल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतला. हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. फलंदाजी करत असलेली अमेलिया केर देखील लिजेल लीकडे पाहतच राहिली.

मुंबई इंडियन्सचा दमदार विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून नेट सिव्हर ब्रंटने ७० धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने नाबाद ७४ धावा केल्या. शेवटी निकोला कॅरीने २१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ४ गडी बाद १९५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून शिनेल हेनरीने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर स्नेह राणाने ११ धावा केल्या. पण दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव १९ षटकात १४५ धावांवर आटोपला.