WPL Matches In Navi Mumbai: भारतात सध्या महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेला ९ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. दरम्यान १४ आणि १५ जानेवारीला होणाऱ्या सामन्यावेळी प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाणार नाही. १५ जानेवारीला महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना युपी वॉरियर्स संघासोबत होणार आहे. तर गुरुवारी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना युपी वॉरियर्सविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत. WPL ने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, “महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील १४ आणि १५ जानेवारी २०२६ ला नवी मुंबईतील डी. वाय.पाटील स्टेडियममध्ये होणारे सामने हे प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत. हा निर्णय १५ जानेवारी २०२६ ला नवी मुंबईत होणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमुळे घेण्यात आला आहे.”
त्यामुळे दोन दिवस प्रेक्षक मैदानात जाऊन सामना पाहू शकणार नाहीत. त्यानंतर १६ जानेवारीला होणाऱ्या सामन्यात प्रेक्षक मैदानात जाऊन सामन्याचा आनंद घेऊ शकता. १६ जानेवारीला होणाऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होणार आहे.
WPL ने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “प्रेक्षकांना १६ जानेवारीला मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर होणारे सर्व सामने हे प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवले जाणार आहेत.” महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील नवी मुंबईत होणारे सामने हे १७ जानेवरीला समाप्त होणार आहेत. शनिवारी होणाऱ्या सामन्यात डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना युपी वॉरियर्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामने वडोदऱ्यात खेळवले जाणार आहेत. इथेच स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने, प्लेऑफचे सामने आणि फायनलचा सामना होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना ५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.
