Mumbai Indians vs Delhi Capitals: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मुंबई इंडियन्सला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमन केलं. मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ४ गडी बाद १९५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करतान दिल्ली कॅपिटल्स संघाला १४५ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह मुंबईने विजयाचं खातं उघडलं आहे.

मुंबई इंडियन्सने ठेवले १९६ धावांचे आव्हान

मुंबई इंडियन्सला या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागलं. मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेली अमेलिया केर शून्यावर माघारी परतली. तर जी कमलिनीने १६ धावांची खेळी केली. या सामन्यातही नेट सिव्हर ब्रंटची चांगलीच तळपली. तिने या डावात ४६ चेंडूंचा सामना करत ७० धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ४२ चेंडूंचा सामना करत नाबाद ७४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार आणि ३ षटकार खेचले. तर शेवटी निकोल कॅरीने २१ आणि सजना सजिवनने ५ धावा करत संघाची धावसंख्या ४ गडी बाद १९५ धावांवर पोहोचवली.

दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लिझी ली ने २ चौकारांच्या साहाय्याने १० धावा केल्या. तर शफाली वर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतली. तर लॉरा वॉल्डवॉर्ह्टला अवघ्या ९ धावा करता आल्या. कर्णधा म्हणून पहिलाच सामना खेळत असलेली जेमिमा रॉड्रिग्ज अवघी १ धाव करत माघारी परतली. शेवटी शिनेल हेनरीने जोर लावला. पण ती ५६ धावांवर माघारी परतली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजयापासून ५० धावा दूर राहिला.

मुंबईचा पहिला विजय

मुंबई इंडियन्सचा हा या हंगामातील पहिलाच विजय ठरला आहे. याआधी मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. पण शेवटच्या षटकात मुंबईला हा सामना गमवावा लागला होता. मात्र, या सामन्यात मुंबईने शेवटपर्यंत आपली पकड बनवून ठेवली.