Mumbai Indians WPL 2026 Qualification Scenario: वुमन्स प्रीमियर लीग २०२६ मधील सर्वच सामने अटीतटीचे आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुरूवातीचे पाचही सामने जिंकत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आरसीबीने या हंगामात आतापर्यंत ५ सामने जिंकले असून सर्वाधिक १० गुण मिळवत प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. तर इतर संघ ४ आणि चारपेक्षा कमी गुणांवर आहेत. यादरम्यान आता मुंबई इंडियन्स व इतर संघांना प्लेऑफ गाठण्यासाठी कसं समीकरण असेल, जाणून घेऊया.
स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाने सोमवार, १९ जानेवारीला गुजराय जायंट्सविरूद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवला. या सलग पाचव्या विजयासह WPL 2026 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला. तीन लीग सामने शिल्लक असताना, आरसीबी आता आपल्या कमालीच्या फॉर्मसह इतर संघाचं समीकरण बदलणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पाच विजयांसह १० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी पाच सामन्यांमध्ये दोन विजय मिळवत ४ गुण संघाकडे आहेत. यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचेही प्रत्येकी ४ गुण आहेत, पण चांगल्या नेट रन रेटमुळे मुंबई इंडियन्स त्यांच्यापेक्षा पुढे आहे. मुंबईचा नेट रनरेट ०.१५१ आहे तर यूपी (-०.४८३) व गुजरातचा (०.८६४) रनरेट मायनसमध्ये आहे.
मुंबई इंडियन्सला WPL 2026 प्लेऑफ गाठण्यासाठी काय करावं लागणार?
मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांनी ५ खेळले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत आणि ४ गुणांवर आहेत. प्ले-ऑफची शर्यत सुरू असून ३ जागा अद्याप शिल्लक आहेत. नेट रन रेटमुळे मुंबई इतर ३ संघांपेक्षा किंचित पुढे आहे तर दिल्ली कॅपिटल्स ४ सामन्यांमधून २ गुणांसह तळाशी आहे. पुढील सर्व सामन्यांमध्ये पराभूत होणाऱ्या कोणत्याही संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण होईल. सध्या सर्व संघांचे किमान तीन सामने शिल्लक आहेत. यासह मुंबईला प्लेऑफ गाठण्यासाठी दोन सामने काही करून जिंकावे लागणार आहेत.

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध होणार आहे. हा सामना आज २० जानेवारीला खेळवला जाणार आहे. वुमन्स प्रीमियर लीगमधील पुढील सर्व सामने कोटांबी येथील बीसीए स्टेडियमवर खेळवले जातील. मुंबईला युपी वॉरियर्जकडून गट टप्प्यातील दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने संघ मागे पडला आहे. दरम्यान पुढील सामन्यात मुंबई व दिल्ली दोन्ही संघांची नजर सामना जिंकण्यावर असेल.
