WPL 2026 Playoff Qualification Scenario: वुमन्स प्रीमियर लीग २०२६ (WPL 2026) च्या अंतिम फेरीत आरसीबीने थेट धडक मारली आहे. लीग टप्प्यातील १८ व्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सचा आठ विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा आरसीबीचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना होता आणि गुणतालिकेत अव्वल १२ गुणांसह संघ थेट फायनल खेळताना दिसेल. यानंतर आता मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स व युपी वॉरियर्ज यांच्यासाठी प्लेऑफचं समीकरण कसं असणार, जाणून घेऊया.
लीग टप्प्यात दोन सामने शिल्लक असून उर्वरित चार संघ गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत. शुक्रवारी ३० जानेवारीला मुंबई इंडियन्स गुजरात जायंट्सशी भिडणार आहे, तर रविवारी १ फेब्रुवारीला यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल, यामधील विजेता संघ अंतिम फेरीत आरसीबीशी खेळेल.
WPL 2026 Points Table
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – १२ गुण – नेट रन रेट १.२४७
गुजरात जायंट्स – ८ गुण – नेट रन रेट ०.२७१
मुंबई इंडियन्स – ८ गुण – नेट रन रेट ०.१४६
दिल्ली कॅपिटल्स – ६ गुण – नेट रन रेट ०.१६४
युपी वॉरियर्ज – ४ गुण – नेट रन रेट -१.१४६
WPL 2026 मध्ये MI, GG, DC आणि UPW संघांचं प्लेऑफचं समीकरण
गुजरात जायंट्स
जर मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला पराभूत केलं तर मुंबईचा संघ प्लेऑफ गाठेल. जर मुंबई इंडियन्सचा गुजरात जायंट्सने पराभव केला तर त्यांना आशा असेल की दिल्ली कॅपिटल्सचा पराभव यूपी वॉरियर्सकडून होईल.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने जर ३० जानेवारीला होणाऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सला पराभूत केलं तर प्लेऑफ गाठतील. जर संघाला पराभव पत्करावा लागला तर त्यांना आशा करावी लागेल की दिल्ली कॅपिटल्स यूपी वॉरियर्सकडून हरेल.
दिल्ली कॅपिटल्स
जर दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सला पराभूत केलं तर मुंबई इंडियन्स-गुजरात जायंट्स सामन्याचा निकाल काहीही असो, ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. जर संघाने सामना गमावला तर ते स्पर्धेबाहेर होतील.
यूपी वॉरियर्स
यूपी वॉरियर्सना दिल्ली कॅपिटल्सला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल आणि त्यांचा नेट रन रेट किमान दोन संघांपेक्षा चांगला असेल अशी आशा करावी लागणार आहे.

