Mumbai Indians vs UP Warriroz: अखेर यूपी वॉरियर्सने विजयाचं खातं उघडलं आहे. महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये यूपी वॉरियर्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण मुंबई इंडियन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात अखेर यूपी वॉरियर्सने विजय मिळवून गुणतालिकेत खातं उघडलं आहे. १६२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या यूपी वॉरियर्सने दिलेलं आव्हान १८ षटकात पूर्ण करून ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

यूपी वॉरियर्सला हा सामना जिंकण्यासाठी १६२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार मेग लॅनिंगने चांगली सुरूवात करून देत २५ धावा जोडल्या. तर किरण नवगिरे अवघ्या १० धावा करत माघारी परतली. त्यानंतर फिबी लिचफिल्ड आणि हरलिन देओलने मिळून वॉरियर्सचा डाव सांभाळला. पण अमेलिया केरने ही जोडी फोडून काढली. फिबी लिचफिल्ड २५ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतली. तर हरलिन देओलने एक बाजू धरून ठेवली होती. हरलिनने अर्धशतकी खेळी करून विजयात मोलाचे योगदान दिले.

मुंबई इंडियन्सने केल्या १६१ धावा

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ नाणेफेक गमावून पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मुंबईकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या अमनजोत कौरने ३३ चेंडूंचा सामना करत ३८ धावांची चांगली सुरूवात करून दिली. तर जी कमलीनी अवघ्या ५ धावा करत माघारी परतली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नेट सिव्हर ब्रंटने ४३ चेंडूंचा सामना करत ६५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ९ चौकार आणि १ षटकार मारला. तर हरमनप्रीत कौरने १६ धावा केल्या. मुंबईचा डाव गडबडला होता. पण शेवटी निकोला कॅरीने नाबाद ३२ धावांची खेळी करून मुंबई इंडियन्सची धावसंख्या ५ गडी बाद १६१ धावांवर पोहोचवली.

अखेर खातं उघडलं

या स्पर्धेत यूपी वॉरियर्सच्या नेतृत्वाची जबाबदारी मेग लॅनिंगकडे सोपवण्यात आली आहे. पण गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये या संघाला विजयाचा सूर गवसला नव्हता. गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यांमध्ये यूपी वॉरियर्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळताना यूपीने पहिला विजय मिळवला आहे.