नवी दिल्ली : भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातील दीप्ती शर्मा, क्रांती गौड आणि श्री चरनी यांना आज, गुरुवारी होणाऱ्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या खेळाडू लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेची तारांकित फलंदाज लॉरा वोल्वार्ड आणि इंग्लंडची आघाडीची फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोन यांच्यासाठीही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळू शकेल.

एकूण २७७ खेळाडू (१९४ भारतीय आणि ८३ परदेशी) या लिलावात सहभाग नोंदवतील. पाच संघांमध्ये जास्तीत जास्त ७३ स्थानांसाठी चुरस पाहायला मिळेल. यामध्ये ५० भारतीय व २३ परदेशी खेळाडू असणार आहे. पहिल्या प्रमुख खेळाडूंच्या यादीत भारताची दीप्ती आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर, न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन आणि अमेलिया कर, इंग्लंडची एक्लेस्टोन, ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली आणि मेग लॅनिंग, दक्षिण आफ्रिकेची वोल्वार्ड यांचा समावेश आहे.

दीप्ती विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली होती. तिला यूपी वॉरियर्सने संघमुक्त केले होते. क्रांती आणि चरणी या युवा खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. यासह गुजरात जायंट्सकडून खेळलेली हरलीन देओल आणि अष्टपैलू स्नेह राणा यांच्यासाठीही संघांत चुरस असेल. एका खेळाडूला संघात कायम राखल्यानंतर यूपी वॉरियर्सकडे लिलावात सर्वाधिक १४.५ कोटी रुपये असतील. दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वांत कमी ५.७० कोटी रुपये असणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना ‘राइट टू मॅच’चा पर्याय वापरता येणार नाही. त्यांनी प्रत्येकी पाच-पाच खेळाडू संघात कायम राखले.