हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील हलालपूर येथे झालेल्या गोळीबारात कुस्तीपटू निशा दहियाचा मृत्यू झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं समोर आलं. निशाची प्रकृती ठणठणीत असून तिनेच एका व्हिडिओद्वारे यांची माहिती दिली होती. आता कुस्तीपटू निशा दहियाने महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. ६५ वजनी गटात निशाने ही कामगिरी केली आहे. निशा रेल्वेकडून खेळत असून उत्तर प्रदेशातील गोंडा येथे स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीत पंजाबच्या जसप्रीत कौरला ३० सेंकदात मात दिली आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. निशाचं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतलं तिसरं सुवर्ण पदक आहे.

“हा माझ्यासाठी एक सुखद धक्का असून शेवट चांगला झाला आहे. मी एक दिवसापूर्वी तणावात होती. मला झोपही लागली नाही. वजन कमी झाल्याने उर्जा कमी झाली होती. अशा वेळी सामना करणं कठीण होतं”, असं निशा दहियाने विजयानंतर सांगितलं.

काय होती घटना?
हलालपूर येथील सुशील कुमार कुस्ती अकादमीत निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, असे वृत्त समोर आले होते. या घटनेत निशा आणि तिचा भाऊ सूरजचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची आई धनपती यांची प्रकृती गंभीर असून तिला रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आले असल्याचे खोटे वृत्त समोर आले होते. मात्र मी ठीक असून मला काहीही झालेले नाही, असे निशाने सांगितले. निशाने गेल्या आठवड्यात बेलग्रेड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. जागतिक २३ वर्षांखालील कुस्ती चॅम्पियनशिपच्या ६५ किलो वजनी गटात तिला हे पदक मिळाले. ती नुकतीच देशात परतली होती.