नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठीच्या निवड चाचणीमधील १२५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर कुस्तीपटू सतेंदर मलिकने पंच जगबीर सिंग यांच्यावर हल्ला केल्यामुळे राष्ट्रीय महासंघाने मलिकवर मंगळवारी आजीवन बंदी घातली आहे.

भारतीय हवाई दलाच्या या कुस्तीपटूने मोहितविरुद्धच्या सामन्यातील निर्णायक १८ सेकंद बाकी असताना सतेंदर ३-० असा आघाडीवर होता. परंतु मोहितने ताबा मिळवण्याची चाल रचत सतेंदरला मॅटच्या बाहेर ढकलले. यावेळी पंच जगबीर सिंग यांनी मोहितला मॅटच्या बाहेर ढकलण्याचा फक्त एक गुण दिला, परंतु ताबा मिळवण्याच्या चालीचे दोन गुण दिले नाहीत. त्यामुळे मोहितने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. त्यांनी मोहितने टाकलेला हा डाव पुन्हा एकदा टीव्हीच्या साहाय्याने पाहिला आणि त्याला बाहेर ढकलण्याचा एक गुण व ताबा मिळवण्याचे दोन गुण असे तीन गुण मोहितला देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मोहित आणि सतेंदर यांच्यात ३-३ अशा गुणांची बरोबरी झाली आणि ती शेवटपर्यंत तशीच कायम राहिली. परंतु शेवटच्या प्रयत्नात मोहितने गुणांची कमाई केल्याच्या निकषावर त्याला या सामन्याचा विजेता ठरवण्यात आले.

सामन्याच्या या निकालानंतर सतेंदर खूप निराश झाला. काहीवेळ तो शांत बसून होता. त्यानंतर मैदानातून उठून तो थेट पंच जगबीर यांच्याकडे गेला आणि त्याने त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. या घटनेमुळे स्टेडियममधील खाशाबा जाधव हॉलमध्ये एकच खळबळ उडाली.