यंदा पद्माश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कुस्तीपटू वीरेंद्र सिंहने मूक-बधीर खेळाडूंना पॅरा-क्रीडापटूंप्रमाणे अधिकार देण्याची मागणी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे केली आहे.

हरयाणा येथील झज्जर जिल्ह्यात जन्मलेल्या वीरेंद्रला बोलता येत नाही आणि ऐकूही येत नाही. त्याने बुधवारी दिल्लीतील हरयाणा भवनच्या बाहेरील पदपथावर बसून छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. त्याने हातात पद्माश्री, अर्जुन पुरस्कार आणि इतर पदके पकडली होती. ‘‘माननीय मुख्यमंत्री एम. एल. खट्टर, मी तुमच्या दिल्लीतील हरयाणा भवनच्या बाहेरील पदपथावर बसलो आहे आणि तुम्ही मूक-बधीर खेळाडूंना पॅरा-क्रीडापटूप्रमाणे अधिकार देत  नाही, तोपर्यंत मी इथून हलणार  नाही. केंद्र सरकारने समान  अधिकार दिले आहेत, तर तुम्ही का नाही?’’ असा सवाल वीरेंद्रने ‘ट्वीट’द्वारे विचारला.