scorecardresearch

संतप्त साहाचे आरोपास्त्र!

श्रीलंकेविरुद्ध मार्च महिन्यात रंगणाऱ्या कसोटी मालिकेसाठी शनिवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला.

संतप्त साहाचे आरोपास्त्र!

द्रविड, निवड समितीकडून निवृत्ती पत्करण्याचे संकेत देण्यात आल्याचा खुलासा

कोलकाता : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने रविवारी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला निवृत्ती पत्करण्याचे संकेत दिले, असा आरोप शांत स्वभावाच्या साहाने केल्यामुळे चाहत्यांमध्ये याविषयी चर्चा रंगत आहे.

श्रीलंकेविरुद्ध मार्च महिन्यात रंगणाऱ्या कसोटी मालिकेसाठी शनिवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. या संघातून साहासह अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंनाही अपेक्षेप्रमाणे वगळण्यात आले. ३७ वर्षीय साहाने रणजी स्पर्धेतूनही माघार घेतली आहे. त्यामुळे साहा आता निवृत्तीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान साहाने यासारख्या असंख्य मुद्यांवर स्पष्टपणे भाष्य केले.

‘‘माझे कोणाशीही वैर नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक द्रविडने मला वैयक्तिक खोलीत बोलावत भविष्यातील आव्हानांची कल्पना दिली. श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले आहे. त्यामुळे तुला संघातून वगळले, तर निराश होऊ नकोस. यादरम्यान, अन्य कोणताही निर्णय घेण्यासाठी तू मोकळा आहेस, असे द्रविड म्हणाल्याने मला धक्का बसला,’’ असे साहा म्हणाला.

‘‘यानंतर काही दिवसांनी निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी मला दूरध्वनीद्वारे रणजीतील सहभागाविषयी विचारले. मी त्यांना अद्याप विचार केलेला नाही, असे सांगितले. त्यावेळी त्यांनीही माझ्यापुढे निवड समितीतील सदस्यांचे मत मांडले,’’ असे ४० कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या साहाने सांगितले. तसेच चेतन यांनी माझे वाढते वय, तंदुरुस्ती अथवा सुमार कामगिरी यामुळे संघातून डावलण्यात येणार नसून युवा खेळाडूंना संधी देण्याच्या हेतूने तुझ्या नावाचा विचार करण्यात येणार नाही, असे सांगितल्याचे साहाने नमूद केले.

‘‘भारतीय संघाकडून खेळण्यासाठी आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची कल्पना मिळाल्याने मी रणजीतही न खेळण्याचे ठरवले,’’ असे साहा शेवटी म्हणाला.

गांगुलीचे आश्वासन आणि धक्का

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत साहाने केलेल्या खुलाशामुळे आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. ‘‘न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत जायबंदी असतानाही ६१ धावांची खेळी केल्यावर गांगुलीने मला व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला. गांगुलीने माझे कौतुक करतानाच तो ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष असेपर्यंत संघातील स्थानाची चिंता करू नये, असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर एका महिन्यातच चित्र पालटले,’’ असे निराश साहाने सांगितले. दरम्यान, संघ निवडीत ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी सहभागी होत नसले तरी त्या संदेशानंतर गांगुलीशी आपण संवाद साधलेला नाही, असेही साहाने कबूल केले.

पुजारा, रहाणेला वगळण्याचा निर्णय योग्यच -गावस्कर

नवी दिल्ली : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी फलंदाजांना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून वगळण्याचा निर्णय अपेक्षित तसेच योग्य असल्याचे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. ‘‘आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पुजारा, रहाणे यांना शतकी खेळी साकारणे गरजेचे होते. रहाणेने त्या दौऱ्यात एक अर्धशतक नक्कीच झळकावले. परंतु त्यामुळे तो संघातील स्थान टिकवू शकत नाही. या दोघांचेही भारतीय संघातील पुनरागमन आता कठीण दिसत आहे. त्यामुळे रणजी स्पर्धेत रहाणे, पुजाराने धावांचा डोंगर उभारावा,’’ असे गावस्कर म्हणाले.

सर्फराज, ऋतुराज कसोटी संघात का नाहीत? -वेंगसरकर

मुंबई : मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सर्फराज खान आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड यांना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न लाभल्याने माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी निवड समितीवर टीका केली आहे. ‘‘श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी कोणत्या उद्देशाने निवड समितीने संघनिवड केली, हे मला समजलेले नाही. सर्फराज आणि ऋतुराज गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्पर्धेत खोऱ्याने धावा करत आहेत. भारतीय संघात समावेश करण्यात आलेल्या दोन खेळाडूंची निवड मला पटत नाही. त्यांच्याऐवजी ऋतुराज आणि सर्फराज संघातील स्थानासाठी पात्र आहेत,’’ असे वेंगसरकर म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wriddhiman saha slams rahul dravid sourav ganguly zws

ताज्या बातम्या