क्रीखेळ हा पूर्वी फक्त मनोरंजनासाठी खेळला जायचा, पण जेव्हापासून खेळ आणि खेळाडूला व्यावसायिकतेचे कोंदण लागले, तेव्हापासून जिंकण्याची ईर्षां वाढली. कामगिरी आणि गुणवत्तेच्या जोरावर विजय आपल्या पदरात पडत नाही, हे पाहिल्यावर काही खेळाडूंचे पावले आपसूकच वळली ती उत्तेजक सेवनाच्या दिशेने. जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत कोणीही चोर नसतो, हे मनाशी पक्केकरून ‘ते’ स्पर्धेत उतरले तेव्हा परिणामांची त्यांना जाणीव होती, पण अव्वल क्रमांक गाठण्याच्या नशेत ‘ते’ मश्गूल होते. सध्या धावपटू असाफा पॉवेल आणि क्रिकेटपटू प्रदीप सांगवान हे उत्तेजकाच्या फेऱ्यात अडकले असून त्याविषयी घेतलेला हा आढावा.
डाक्षेत्रात आधुनिक सोयीसुविधा जशा वाढत चालल्या आहेत, तसे खेळात उत्तेजके घेण्याचे प्रमाणसुद्धा वाढत चालले आहे. खेळ कोणताही असो, उत्तेजके घेणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, हे प्रत्येक राष्ट्राचे धोरण असतानाही जवळपास सर्वच खेळांमध्ये उत्तेजकांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्तेजकांची गरज आहे, ही खेळाडूंची मानसिकता बनली आहे का? की दोषी सापडल्यानंतर होणाऱ्या शिक्षेला न धजावण्याची खेळाडूंची वृत्ती बनली आहे?
अ‍ॅथलेटिक्सचा आत्मा म्हणजे छोटय़ा पल्ल्याच्या शर्यती. १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतींचा बादशाह कोण, असे विचारल्यावर काही वर्षांपूर्वी टायसन गे, असाफा पॉवेल, योहान ब्लेक, जस्टिन गॅटलिन ही नावे डोळ्यांसमोर यायची. पण पाच-सहा वर्षांपूर्वी चित्त्याच्या वेगाने धावणाऱ्या युसैन बोल्टने या सर्वाची मक्तेदारी मोडीत काढून १०० मीटर, २०० मीटर शर्यतींचा अनभिषिक्त सम्राट असा नावलौकिक मिळवला. पण प्रतिस्पध्र्याचे कडवे आव्हान असल्याशिवाय, कोणताही खेळाडू सर्वोत्तम कामगिरी साकारू शकत नाही. बोल्टच्या मार्गात टायसन गे, पॉवेल, ब्लेक हे महत्त्वपूर्ण अडथळे असल्यामुळेच तो जगावर अधिराज्य गाजवू शकला. या मोसमातील सर्वात वेगवान धावपटू आणि बोल्टचा मुख्य प्रतिस्पर्धी अमेरिकेचा टायसन गे आणि जमैकाचा १०० मीटरमधील माजी विश्वविक्रमवीर असाफा पॉवेल उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे संपूर्ण अ‍ॅथलेटिक्सविश्व हादरले आहे. काही आठवडय़ांपूर्वी तुर्कस्तानच्या ३० अ‍ॅथलिट्सवर उत्तेजकांमुळे बंदी घालण्यात आली. या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या रशियाचे तब्बल ४४ अ‍ॅथलिट उत्तेजकांमुळे बंदीची शिक्षा भोगत आहेत. यावरूनच उत्तेजकांचे साहाय्य घेऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याची ‘नशा’ अ‍ॅथलिट्सच्या डोक्यात भिनली आहे, हेच दिसून येते.
टूर-डी-फ्रान्स शर्यतीचा सात वेळा विजेता ठरलेला महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने आपल्या कारकीर्दीत अगदी पद्धतशीर आणि आधुनिकपणे उत्तेजकांचे सेवन करून सर्वाना धोका दिला. त्या पद्धतीने कोणताही अ‍ॅथलिट उत्तेजक घेत नसल्याचे त्यांच्या प्राथमिक चौकशीवरून दिसून येत आहे. पण असंख्य अ‍ॅथलिट्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळू लागल्यामुळे जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या (वाडा) कार्यपद्धतीवरही संशय येऊ लागला आहे. नोव्हेंबर १९९९मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘वाडा’ची कार्यप्रणाली जगभरातील जवळपास सर्वच खेळांनी अंगीकारली आहे. कोणत्या उत्तेजकांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे, हे ‘वाडा’ने स्पष्ट केले आहे. तरीही खेळाडूंना ‘उत्तेजक साक्षर’ करण्यात ‘वाडा’ अपयशी ठरली का, असाच प्रश्न डोक्यात येतो. भारतात बरेचसे अ‍ॅथलिट हे खेडय़ापाडय़ांतून, ग्रामीण भागांतून पुढे आलेले आहेत. त्यांचा आणि शिक्षणाचा दुरान्वये संबंध आलेला नसतो. खोकला, ताप अशा आजारांवर कोणती औषधे घ्यायची, हेसुद्धा त्यांना माहीत नसते. स्पर्धेवेळी अशाच आजारावर प्रशिक्षकांनी दिलेल्या औषधामुळे अनेक अ‍ॅथलिट उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे वाडा किंवा भारतात कार्यरत असलेली राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्था ‘नाडा’ यांनी खेळाडूंमध्ये उत्तेजकाबाबतीत जागरूकता आणायला हवी. खेळाडूंना कोणती औषधे घ्यायची आणि कोणत्या औषधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे, हे समजले तरच खेळाडूंच्या उत्तेजक सेवनाला आळा घालता येऊ शकेल.
दुसरी बाजू म्हणजे व्यावसायिक खेळाडूकडून प्रशिक्षक, चाहते, कुटुंबीय आणि पुरस्कर्त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा असतात. खेळाडूने एखाद्या महानायकाप्रमाणे ‘न भूतो, न भविष्यती’ अशी कामगिरी सादर करावी, अशी त्यांची अपेक्षा असते. यशोशिखरावर पोहोचण्याच्या याच दबावामुळे खेळाडूंची पावले वाईट मार्गाकडे वळतात. कामगिरी उंचावणारी उत्तेजके घेण्यावाचून त्यांच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. कधी कधी प्रशिक्षक, सहकारी, ट्रेनर आणि फिजिशियन हेसुद्धा खेळाडूला कामगिरी उंचावणारी उत्तेजके घेण्याचा सल्ला देतात. सर्वच अ‍ॅथलिट श्रीमंत नसतात. त्यांना मिळणारा पैसा हा खेळातून नव्हे तर पुरस्कर्त्यांचा रूपाने मिळत असतो. बरेचसे अ‍ॅथलिट अनेक वर्षांपासून प्रशिक्षक, ट्रेनर आणि जिमवर अमाप पैसा खर्च करत असतात. एखाद्या स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली तरच पुरस्कर्ते त्यांच्यामागे धावून येतात. अन्यथा, कुणीही त्यांना विचारत नसतो. त्यामुळे कारकीर्द घडवण्यासाठी लागणारा अमाप पैसा आणायचा कुठून? हा प्रश्न त्यांना सतावत असतो. त्यातच आपल्या क्षेत्रातील यशस्वी खेळाडूंनी उत्तेजके घेऊन कारकीर्द घडवली आहे, हे त्यांना समजल्यानंतर तेसुद्धा अशाच वाईट मार्गाकडे आकर्षित होतात. बरेचसे अ‍ॅथलिट सर्रासपणे उत्तेजकांचे सेवन करतात. पण उत्तेजक चाचणीत पकडू जाऊ नये, यासाठी ते शास्त्राच्या बरीच पावले पुढे असतात. उत्तेजक चाचण्या कशा पार करायच्या, याचे ज्ञान त्यांना अवगत असते.
उत्तेजके घेतल्याचे दुष्परिणाम अ‍ॅथलिट्सना भलेही कारकिर्दीदरम्यान जाणवणार नाहीत. पण आपण समाजाची, स्वत:ची किती फसवणूक केली आहे, हे त्यांना त्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्यानंतर लक्षात येऊ लागते. अशाच प्रकारे अव्वल अ‍ॅथलिट्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळू लागले तर बोल्टसारख्या खेळाडूंसमोर तगडे प्रतिस्पर्धीच शिल्लक राहणार नाहीत.. चाहत्यांनाही अव्वल दर्जाचा खेळ पाहायला मिळणार नाही.. म्हणूनच उत्तेजकांचा मुळापासून नायनाट  करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज भासू लागली आहे.