लंडन : ‘आयसीसी’ विजेतेपदापासून दहा वर्षे दूर राहिलेल्या भारतीय संघाच्या सगळय़ा नजरा आता बुधवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद लढतीकडे लागून आहेत. अलीकडच्या काळात भारताला ‘आयसीसी’ विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना आमच्यावर या अपयशाचे किंवा विजेतेपद मिळवण्याचे कसलेच दडपण नाही, असे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान हा अंतिम सामना ओव्हल मैदानवार खेळवण्यात येणार आहे. जागतिक कसोटी स्पर्धेचे हे दुसरे सत्र असून, पहिल्या सत्रात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यापूर्वी २०१४ ट्वेन्टी-२० विश्वचषक, चॅम्पियन्स करंडक (२०१७) या प्रमुख स्पर्धाच्या अंतिम फेरीत भारताला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. भारतीय संघ २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धा, तसेच २०१६, २०२१ ट्वेंन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दडपणाचा सामना करू शकला नव्हता.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.