पीटीआय, साऊदम्पटन 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीचा शुक्रवारचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार राखीव दिवस खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी विजेत्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. शुक्रवारी पहिल्या दिवशी मुसळधार पावसामुळे सहा तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे मैदानावर पाणी साचले होते. उत्तम जलनिचरा करण्याची प्रणाली असतानाही सलामीच्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे शनिवारी ९८ षटकांचा खेळ होणार आहे.

पंच मायकेल गॉफ आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ठरावीक काळाने मैदानाची पाहणी केल्यानंतर दुपारी ३ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायं. ७.३० वा.) पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले. जागतिक अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीसाठी साऊदम्पटन हे ठिकाण निश्चित करण्यापूर्वी ‘आयसीसी’ आणि इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळाने ‘बीसीसीआय’ला विश्वासात घेतले. या ठिकाणी असलेल्या पंचतारांकित जैव-सुरक्षित परिघाची हमी दिली.

४ गेल्या पाच वर्षांत इंग्लंडमध्ये पुरुषांचे ३२ कसोटी सामने झाले आहेत. यापैकी फक्त चार कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्यामुळे पावसामुळे खेळ वाया गेला तरी सामना निर्णायक ठरू शकतो.

भारतीय संघात बदल नाही -श्रीधर

जागतिक अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला असून अद्याप नाणेफेकही झालेली नसली, तरी भारतीय संघातील ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी स्पष्ट केले. न्यूझीलंडने अजूनही अंतिम संघ जाहीर केलेला नसून भारतालासुद्धा सद्यस्थितीचा आढावा घेऊन नाणेफेकीपूर्वी संघात बदल करण्याची संधी आहे.

राखीव दिवस उपलब्ध

अंतिम लढतीसाठी २३ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे हवामान किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव सामन्यातील खेळाचे नुकसान झाल्यास हा खेळ सहाव्या दिवशी खेळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता सहाव्या दिवशी खेळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त दिवसाचा खेळ होऊनही सामना अनिर्णीत राहिल्यास किंवा बरोबरीत (टाय) सुटल्यास भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद बहाल करण्यात येईल.