Virat Kohli on Shubman Gill WTC Final Oval: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला किंग म्हटले जाते. कोहलीच्या खेळामुळे त्याला क्रिकेट विश्वात हा दर्जा मिळाला आहे. त्याच वेळी, टीम इंडियाचा उदयोन्मुख युवा सलामीवीर शुबमन गिलची बॅट अलिकडच्या काळात तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगलीच तळपली आहे. त्याने कसोटीपासून आयपीएलपर्यंत सर्वत्र धावा केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने न्यूझीलंडविरुद्ध वन डेमध्ये द्विशतकही झळकावले होते.
इतकेच नाही तर या मोसमात त्याने ३ शतके झळकवताना तो आयपीएल २०२३मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील होता. अशा स्थितीत गिल आता कोहलीचा उत्तराधिकारी मानला जात आहे. चाहते जसे कोहलीला ‘किंग’ म्हणतात तसे आता शुबमनला ‘प्रिन्स’ म्हणू लागले आहेत. पण किंग आणि प्रिन्सच्या या टॅगबद्दल खुद्द विराट कोहलीचं काय मत आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या.
किंग आणि प्रिन्सच्या टॅगवर कोहलीने केले मोठे वक्तव्य
स्वतःला ‘किंग’ आणि शुबमन ‘प्रिन्स’ म्हणवून घेणारा विराट कोहली, आयसीसीला म्हणाला, “किंग आणि प्रिन्सचे टॅग किंवा अशा गोष्टी चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी चांगल्या असतात. पण माझ्या मते वरिष्ठ खेळाडूचे काम युवा खेळाडूंना त्यांच्या खेळात सुधारणा करण्यास मदत करणे आहे. चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला वेगवेगळ्या नावाने आवाज देतात, प्रेम करतात.”
कोहली पुढे म्हणाला, “तो (शुबमन गिल) माझ्याशी खेळाबद्दल खूप बोलतो, गिल शिकण्यास उत्सुक आहे आणि या वयात त्याचे कौशल्य अप्रतिम आहे. त्याच्याकडे वरच्या स्तरावर कामगिरी करण्याची जबरदस्त क्षमता असून मागील काही काळात त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. गिल आणि माझे नाते आमच्यातील समजूतदारपणावर आधारित आहे.”
किंग कोहली पुढे म्हणाला, “मला त्याला पुढे जाण्यास मदत करायची आहे. त्याला स्वतःची क्षमता समजून घ्यावी लागेल. यामुळे तो सातत्यपूर्ण कामगिरी करू शकेल आणि दीर्घकाळ टीम इंडियासाठी खेळू शकेल, याचा फायदा भारतीय क्रिकेटला होईल.”
आतापर्यंत सामन्यात काय झाले?
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. उपाहारानंतर दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. उपाहारानंतर पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने मार्नस लॅबुशेनचा त्रिफळा उडवला. त्याला ६२ चेंडूत २६ धावा करता आल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सध्या ७६ धावांत ३ विकेट्स अशी आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड क्रीजवर आहेत. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरही बाद झाले आहेत.