Australia Ball Tampering IND vs AUS WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतावर भारी पडत असताना, पॅट कमिन्स आणि त्याच्या टीमवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने बॉल टॅम्परिंगचा आरोप केला आहे. “१५ व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून बॉलची छेडछाड करण्यात आली. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या भारताच्या दोन अव्वल फलंदाजांना बाद करण्यासाठी हा घाणेरडा प्रकार करण्यात आला आणि त्यामुळेच पुजारा आणि कोहली या दोघांनाही अनुक्रमे कॅमेरून ग्रीन आणि मिचेल स्टार्क यांनी बाद केले” असा आरोप माजी फलंदाज बासित अली याने केला आहे. असे म्हणताना “ओव्हलवर अधिकारी, समालोचक आणि भारतीय फलंदाज स्वतः.यापैकी कोणीही ऑस्ट्रेलियाच्या डावपेचांची दखल घेत नसल्याचे पाहून मला धक्का बसला, अंपायर आंधळे आहेत का?” असेही अलीने पुढे म्हटले आहे.
अली यांनी युट्युब चॅनेलवर म्हटले की, “सर्वप्रथम, मी कॉमेंट्री बॉक्समधून सामना पाहणाऱ्यांसाठी आणि पंचांसाठी टाळ्या वाजवू इच्छितो? ऑस्ट्रेलियाने स्पष्टपणे चेंडूशी छेडछाड केली आहे आणि कोणीही त्याबद्दल बोलत नाही. कोणीही फलंदाज विचार करत नाही की ‘काय होत आहे?’ म्हणजे ऑफसाईड द ऑफ स्टंप हा प्रत्येक फलंदाजाला माहिती असतो. पण एकाच वेळेस दोन्ही फलंदाज एकाच पद्धतीने लागोपाठ बाद होतात याच आश्चर्य कोणालाच वाटले नाही का? मी तुम्हाला पुरावा देखील देतो. शमी गोलंदाजी करत असताना ५४ व्या षटकापर्यंत चेंडूला असणारी चमक बाहेरून होती आणि चेंडू स्टीव्ह स्मिथकडे परत गेला. याला रिव्हर्स स्विंग म्हणता येणार नाही. रिव्हर्स स्विंग म्हणजे जेव्हा चमक आतील बाजूस असते आणि चेंडू परत येतो.”




कोहली आणि पुजाराच्या बाद होण्याचा प्लॅन बघता, १६ ते १८ षटकांमध्ये बॉल टॅम्परिंगचे स्पष्ट पुरावे आहेत. डावाच्या १८ व्या षटकात, पंच रिचर्ड केटलबरोच्या सूचनेनुसार चेंडू बदलला गेला होता. चेंडूंचा बॉक्स आला आणि नवीन चेंडू घेतला गेला, अलीच्या मते यानंतर भारताची ३०/२ वरून ७१/४ अशी घसरण झाली.
“ग्रीनने पुजाराच्या दिशेने चमक दाखवत गोलंदाजी केली आणि चेंडू परत आत गेला? मला आश्चर्य वाटले. बीसीसीआय एवढा मोठा बोर्ड आहे, ते या गोष्टी पाहू शकत नाहीत का? याचा अर्थ असा आहे की तुम्ही क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत नाही. भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे एवढ्यातच त्यांना आनंद आहे. १५-२० षटकांमध्ये चेंडू कधी रिव्हर्स स्विंग होतो, तोही ड्यूक्स चेंडू? मला समजते की कुकाबुरा चेंडू असता तर समजता आले असते पण ड्यूक्स चेंडू किमान ४० षटकांपर्यंत टिकतो,” अली म्हणाला.
हे ही वाचा<< अजिंक्य रहाणेच्या हुशारीपुढे अंपायर फेल! आउट जाहीर होताच सेकंदात पॅट कमिन्सची मोठी चूक पकडली, DRS Video पहा
२०१८ मध्ये ‘सँडपेपर गेट’ नंतर बॉल टॅम्परिंग हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील एक संवेदनशील विषय ठरला आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडू स्विंग करण्यासाठी चेंडूवर सँडपेपर वापरण्यावरून दोषी जाहीर करण्यात आले होते. टेलिव्हिजन कॅमेर्यांनी हे कृत्य टिपल्यानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नर आणि स्मिथवर १२ महिन्यांची बंदी घातली, तर बॅनक्रॉफ्टला नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.