वृत्तसंस्था, कोलकाता

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेतील (डब्ल्यूटीसी) विद्यमान विजेत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी दोन सामन्यांची मालिका नव्या हंगामात गुणकमाईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे वक्तव्य भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने केले.

भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’च्या गुणतक्त्यात सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली आणि त्यानंतर मायदेशात वेस्ट इंडिजला २-० असे हरवले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाने विजेतेपदानंतर खेळलेल्या पहिल्या मालिकेत पाकिस्तानला १-१ असे बरोबरीत रोखून हंगामाची आश्वासक सुरुवात केली आहे.

‘‘डब्ल्यूटीसीच्या नव्या हंगामातील ही मालिका खूप महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिका गतविजेते असल्यामुळे आम्हाला त्यांचा आदर करावाच लागेल. अर्थात, भारतीय संघाची चांगली तयारी असून, संघातील वातावरणही सकारात्मक आहे. इंग्लंडमध्ये मालिकेतील बरोबरी आणि त्यानंतर मायदेशातील विंडीज संघावरील विजय यामुळे आमचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे. सर्वच खेळाडू लयीत असल्यामुळे या मालिकेत चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे,’’ असे सिराज म्हणाला.

विशेष म्हणजे जसप्रीत बुमराच्या उपस्थितीत आणि गैरहजेरीतही सिराजने आपली चांगली लय राखली आहे. इंग्लंडविरुद्ध पाच कसोटीत त्याने २३ गडी बाद करण्याची किमया साधली, तर वेस्ट इंडिजविरुद्धही दोन सामन्यांत १० गडी बाद केले.

‘‘वैयक्तिक कामगिरीबाबत मी नक्कीच समाधानी आहे. मी लयीत आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा मी प्रयत्न करेन. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नव्या आव्हानासाठी मी सज्ज आहे,’’ असे सिराजने सांगितले.