World Test Championship Points Table After Aus vs Ban 1st Test: बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना डार्विनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. बांगलादेशने आजवर ऑस्ट्रेलियात खेळताना कसोटी विजय मिळवला नव्हती, पण आता ही ऐतिहासिक कामगिरी नजमूल हुसेन शांतोच्या नेतृत्वात खेळताना बांगलादेशने करुन दाखवली आहे. बांगलादेशने हा सामना ९ गडी राखून जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर गुणतालिकेवर मोठा परिणाम झाला आहे. हा सामना सुरु होण्याआधीही ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. तर बांगलादेशचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी होता. हा सामना जिंकून बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दावा आणखी मजबूत केला आहे. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.

बांगलादेशच्या विजयामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु होण्याआधी देखील ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. ऑस्ट्रेलियाचे गुण ८४ तर विजयाची सरासरी ८७.५०% इतकी होती. तर बांगलादेशचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी होता. बांगलादेशचे गुण २८ होते, तर विजयाची सरासरी ५८.३३% इतकी होती. पण बांगलादेशने पराभूत केल्यानंतर आता गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. पण विजयाच्या सरासरीत घसरण झाली असून, ही सरासरी ७७.७८% वर जाऊन पोहोचली आहे. तर बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानी कायम असून विजयाच्या सरासरीत वाढ झाली आहे. सरासरी आता ६६.६७% वर जाऊन पोहोचली आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी कायम आहे. भारतीय संघाच्या विजयाची सरासरी ४८.१५% इतकी आहे. पण भारतीय संघाला जर गुणतालिकेत पुढे जायचं असेल, तर श्रीलंकेला कुठल्याही परिस्थितीत हरवणं गरजेचं असणार आहे.

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

डार्विनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात एकतर्फी लढत पाहायला मिळाली. सामन्यातील पहिल्या दिवसापासून बांगलादेशचा बोलबाला पाहायला मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फंलदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९८ धावांवर आटोपला. यादरम्यान स्टीव्ह स्मिथने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशकडून तन्झीदने दमदार शतक झळकावलं. यासह आणखी २ फलंदाजांनी अर्धशतक झळकावून संघाची धावसंख्या ४२६ धावांवर पोहोचवली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून कॅमरुन ग्रीनने १०४ धावांची दमदार शतकी खेळी केली. पण ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या २८४ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने बांगलादेशसमोर विजयासाठी अवघ्या ५७ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान बांगलादेशने सहज पूर्ण करत ९ गडी राखून विजयाची नोंद केली.

कोणता संघ कितव्या स्थानी?

१) ऑस्ट्रेलिया
२) दक्षिण आफ्रिका
३) न्यूझीलंड
४)बांगलादेश
५)भारतीय संघ
६) श्रीलंका
७)इंग्लंड
८)पाकिस्तान
९)वेस्ट इंडिज