आयपीएल २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होत असून, गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्याच दिवशी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरणार आहे. त्याआधी संघाने सराव सत्रालाही सुरुवात केली असून, बहुतेक खेळाडू विशेषत: भारतीय खेळाडू यात सहभागी झाले आहेत. विराट कोहली देखील सरावासाठी उपस्थित होता. मात्र संघाच्या एका गोलंदाजासाठी काहीच संपर्क नसल्याची माहिती समोर आली आहे.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयाल याची संघात आणि सराव सामन्यांमधील अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. यश दयालशी कोणताही संपर्क होत नसल्याची माहितीदेखील समोर आली आहे. संघाच्या बसवरील चित्रांमध्येही त्याचा चेहरा दिसला नाही. गेल्या वर्षी त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप झाले होते, त्यामुळे ही बाब अधिक चर्चेत आली आहे.
यश दयालने २०२५ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील अंतिम सामन्यात शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. त्यानंतर आरोप समोर आल्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. कायदेशीर प्रकरणांमुळे त्याची उत्तर प्रदेश संघातही निवड करण्यात आली नाही. टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे एक्सलेन्स केंद्र किंवा त्याचा बालपणीचे प्रशिक्षक कोणालाही त्याच्याशी संपर्क साधता आलेला नाही.
“त्याच्याविरोधात खटला सुरू असल्यामुळे त्याची निवड विचारात घेण्यात आली नाही. सप्टेंबरमध्ये बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलेन्सकडून त्याच्याबाबत चौकशीसाठी फोन आला होता, मात्र आम्हाला यश दयालशी संपर्क साधता आला नाही. त्याने आपला मोबाईल नंबरही बदलला आहे. इतकंच नाही, तर त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकालाही तो सध्या कुठे आहे, याची माहिती नाही,” असं उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान यश दयालने या सगळ्यादरम्यान लग्नदेखील केलं आहे. त्याने इन्फ्लुएन्सर श्वेता पुंडीर हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर यश दयाल सराव करतानाचा व्हीडिओ शेअर केला होता. मात्र हा सराव बंगळुरूमध्ये करत नसल्याचं स्पष्ट होतं.
यश दयालवर कोणते आरोप आहेत?
यश दयालविरुद्ध दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही (पॉक्सो) एक प्रकरण समाविष्ट आहे.
जयपूर येथील एका तरुणीने सांगानेर सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यास मदत करण्याचे आश्वासन देत यश दयालने तिचा दीर्घकाळ गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. त्याने स्वतःला क्रिकेटपटू म्हणत सादर करून तिच्यावर भावनिक प्रभाव टाकला आणि भविष्यात मदत व संधी देण्याचे आश्वासन दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
