Yashasvi Jaiswal Controversial Wicket INDA vs ENGA: भारत अ संघ इंग्लंड दौऱ्यावरील दुसरा अनऑफिशियल कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकत इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ बाद ३१९ धावा केल्या आहेत. केएल राहुलच्या शतकाने भारताचा डाव सावरत मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली. दरम्यान यशस्वी जैस्वाल या सामन्यातही अपयशी ठरला आणि बाद झाल्यानंतर मैदानावर पंचांशी वाद घालताना दिसला.
यशस्वी जैस्वाल दुसऱ्या सामन्यात मैदानावर पंचांशी वाद घालताना दिसला. दुसऱ्या अनऑफिशियल चार दिवसीय कसोटी सामन्यात जैस्वाल सलामीला आला तेव्हा तो १७ धावांवर खेळत होता. त्यानंतर मैदानावरील पंचांनी ख्रिस वोक्सच्या चेंडूवर त्याला एलबीडब्ल्यू आउट घोषित केले, पण त्याच्यामत तो बाद नसल्याने मैदान सोडू इच्छित नव्हता. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत अ संघ नॉर्थम्प्टन मैदानावर दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या दिवशी भारत अ संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल सलामीसाठी उतरला. डावाच्या सातव्या षटकात इंग्लंडचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने त्याच्या पायात चेंडू टाकला. या चेंडूवर जैस्वाल गडबडला आणि पायचीत झाल्याचे अपील इंग्लंडने केले.
इंग्लंडच्या संघाने अपील केल्यानंतर जैस्वालला खात्री होती की तो बाद झाला नाही आणि तो क्रीजवर उभा होता. मैदानावरील पंचांनी त्याला बाद घोषित केल्यावर तो रागावला आणि पंचांना काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर तो रागाच्या भरात पॅव्हेलियनमध्ये गेला.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी यशस्वी जैस्वालची बॅट अजूनही शांत आहे. गेल्या सामन्यात जैस्वालने २४ आणि ६४ धावा केल्या होत्या. त्यानंतर तो १७ धावा करून बाद झाला. त्यामुळे, जर यशस्वी जैस्वालला आगामी कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरी करायची असेल, तर त्याला भारत अ संघाकडून खेळताना लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुन्हा फॉर्म मिळवावा लागेल.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, केएल राहुल आणि जैस्वालची जोडी कसोटी संघासाठी सलामीला येऊ शकते. केएल राहुलला पहिल्याच सामन्यात सूर गवसला असून त्याने शानदार शतकी कामगिरी केली. त्याचे शतक आणि ध्रुव जुरेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने चांगली धावसंख्या उभारली आहे. जैस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १९ सामन्यांमध्ये १७९८ धावा केल्या आहेत.