Yashasvi Jaiswal Asitha Fernando ICC controversy new video angle: भारताचा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात कोसलंबो कसोटीच्या पहिल्याच दिवशी वाद झाला होता. दोन्ही खेळाडू जणू मारहाण करण्याच्याच तयारीत होतं. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या शारीरिक वादासाठी आयसीसीकडून दंड ठोठावण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दोघांवर तातडीने कारवाई करत त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के दंडाची शिक्षा सुनावली. यादरम्यान आयसीसीने यशस्वी जैस्वालची चूक नसल्याचं निवेदनात म्हटलं. पण आता नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर आयसीसी जैस्वालला पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

या घटनेनंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी यशस्वीलाच दोषी ठरवलं होतं. संपूर्ण वादाची सुरुवात यशस्वीनेच केल्याचा दावा काही चाहत्यांनी केला. मात्र, ICCने जारी केलेल्या अधिकृत निवेदनातून या घटनेचं वेगळंच चित्र समोर आलं. भारताच्या डावातील १७व्या षटकात झालेल्या या प्रकारासाठी ICCने दोन्ही खेळाडूंना आक्रमक वर्तनासाठी जबाबदार धरलं.

ICCच्या निवेदनात म्हटलं आहे, “भारताच्या डावातील १७व्या षटकात फर्नांडोने यशस्वीला बाद केल्यानंतर ही घटना घडली. भारतीय फलंदाज फर्नांडोच्या दिशेने गेला आणि दोघांमध्ये शाब्दिक देवाणघेवाण झाली. त्यानंतर फर्नांडोने आपलं डोकं यशस्वीच्या दिशेने नेलं. त्याला प्रत्युत्तर देताना यशस्वीही पुढे झुकला आणि दोघांच्या डोक्यांचा संपर्क झाला.”

ICCने पुढे सांगितलं की, दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली आणि एमिरेट्स ICC एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीचे सदस्य अँडी पायक्रॉफ्ट यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणी घेण्याची गरज भासली नाही.

यशस्वीला दोषी ठरवणाऱ्या चाहत्यांची संख्या वाढू लागल्यानंतर, या क्रिकेटपटूने क्रिकबझच्या वादाच्या घटनेवरील व्हिडिओवर एक संतप्त प्रतिक्रिया देत पलटवार केला. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्या सहभाग असलेल्या या व्हिडिओवर यशस्वीने कमेंट करत लिहिलं, “त्याने काय म्हटलं हे तुम्हाला माहीत नसेल, तर कृपया कोणताही निष्कर्ष काढू नका. जर कोणी मर्यादा ओलांडली असेल, तर हा भारतीय संघ लढेल आणि उत्तर देईल, याची जाणीव करून द्यावी लागेल.”

ICC यशस्वीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का?

मात्र, मंगळवारी या घटनेचा नवा व्हिडीओ अँगल सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या नव्या फुटेजमुळे ICCने आपल्या अधिकृत निवेदनात केलेल्या घटनेच्या वर्णनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही जणांच्या मते, ICCने यशस्वी आणि फर्नांडो यांच्यातील नेमक्या वादाचं वर्णन चुकीच्या पद्धतीने केलं असावं.

श्रीलंकेचे प्रसिद्ध क्रिकेट पत्रकार अँड्र्यू फिडेल फर्नांडो यांनी ICCच्या अधिकृत निवेदनावरच गंभीर सवाल उपस्थित केला. त्यांच्या मते, असिथा फर्नांडोने यशस्वी जैस्वालच्या दिशेने डोकं नेलं, असा ICCने केलेला दावा चुकीचा आहे. फर्नांडो यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “काल ICCने आपल्या निवेदनात ‘फर्नांडोने यशस्वीच्या दिशेने डोकं नेलं. त्याला प्रत्युत्तर देताना यशस्वी पुढे झुकला आणि दोघांच्या डोक्यांचा संपर्क झाला,’ असं म्हटलं. हे तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचं आहे. व्हिडीओ पाहा. खेळाच्या सर्वोच्च नियामक संस्थेने चाहत्यांशी थेट खोटं बोलल्याचं हे उदाहरण आहे.”

नव्या व्हिडीओ अँगलमुळे ICCच्या अधिकृत वर्णनावर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणात घटनेचं नेमकं चित्र काय होतं, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. श्रीलंकेच्या पत्रकाराच्या या मताशी अनेकांनी सहमती दर्शवली. काहींच्या मते, या घटनेसाठी यशस्वी जैयस्वालला ठोठावण्यात आलेला २५ टक्के मॅच फीचा दंड अपुरा असून, त्याच्यावर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी होती. त्यामुळे समोर आलेल्या नव्या व्हिडिओ अँगलमुळे आधीच वादग्रस्त ठरलेल्या या प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळालं आहे.