Yashasvi Jaiswal Century, IND A vs NZ A: भारतीय अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी यशस्वी जैस्वालला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. पण यशस्वी जैस्वालला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंड अ विरुद्ध २ अनधिकृत कसोटी सामन्यातील ३ डावात यशस्वी जैस्वालची बॅट शांतच राहिली. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नव्हतं. पण दुसऱ्याच कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने शतक झळकावून दमदार पुनरागमन केलं आहे.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेची पूर्वतयारी म्हणून यशस्वी जैस्वालला भारतीय अ संघात स्थान देण्यात आलं आहे. केएल राहुलसोबत डावाची सुरूवात करताना तो आपल्या संघाला हवी तशी सुरूवात करून देऊ शकलेला नाही. गेल्या डावात त्याने १७, ५ आणि ० धावा केल्या होत्या. लागोपाठ ३ डावात फ्लॉप राहिल्यानंतर अखेर चौथ्या डावात त्याला सूर गवसला आहे. यशस्वीने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या कसोटी क्रिकेटसाठी कठीण परिस्थितीत दमदार शतकं झळकावली आहेत. आता न्यूझीलंडसारख्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर धावा करण्याचं आव्हान यशस्वीसमोर असणार आहे. २ कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. त्याआधी यशस्वीने फॉर्ममध्ये परतणं खूप गरजेचं होतं. अखेर शतक झळकावून त्याने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत.

दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना यशस्वीने १६२ चेंडूंचा सामना करत १५५ धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार खेचले. मुख्य बाब म्हणजे त्याने षटकार खेचून आपलं शतक पूर्ण केलं. आतापर्यंत यशस्वी धावा करताना संघर्ष करताना दिसून येत होता. पण या डावात त्याने संयम दाखवला आणि एकेरी दुहेरी धावा घेण्यावर भर दिला. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्याने मोठे फटकेही मारले. गेल्या ३ डावात फ्लॉप ठरल्यानंतर अखेर या खेळीमुळे त्याच्या आत्मविश्वासात भर पडली असेल.

मालिकेतील पहिला सामना ड्रॉ राहिल्यानंतर आता दुसरा सामनाही ड्रॉ राहिला आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. या डावात भारतीय संघाने ३४६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि ४२४ धावांचा डोंगर उभारला. यासह भारतीय संघावर आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाने एकही विकेट न गमावता २८२ धावा केल्या. यादरम्यान यशस्वी जैस्वाल १५५ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे सामना ड्रॉ घोषित करण्यात आला.