India vs Afghanistan 3rd ODI: यशस्वी जैस्वालचं नाबाद शतक आणि रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने २१९ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्या डावात फलंदादी करताना अवघ्या २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने मिळून पहिल्या विकेटसाठी १७० धावा जोडल्या आणि भारतीय संघाला ९ गडी राखून दमदार विजय मिळवून दिला. यासह ३-० ने अफगाणिस्तानचा सुपडा साफ केला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या २१८ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१९ धावा करायच्या होत्या. भारताचा मजबूत फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान फार मोठं नव्हतं. भारताकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने मिळून १७० धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोघांना शतक झळकावण्याची समान संधी होती. पण रोहित शर्मा ६९ चेंडूंमध्ये ७९ धावांची खेळी करुन माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने श्रेयस अय्यरसोबत मिळून किल्ला लढवला. यशस्वीने ९४ धावांवर फलंदाजी करत असताना, षटका मारुन आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरं शतक ठरलं. मुख्य बाब म्हणजे, हे त्याच्या तिसऱ्या डावातील दुसरं शतक ठरलं आहे. यशस्वीने ८६ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली आणि षटकार मारुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तर श्रेयस अय्यरने १९ चेंडूंमध्ये नाबाद २० धावांची खेळी केली.

हशमतुल्ला शाहिदीचं शतक

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय सुरुवातीलाच फसला. कारण रहमानुल्लाह गुरबाज ५, इब्राहिम जादरान अवघ्या ११ आणि रहमत शाह अवघ्या ५ धावा करुन माघारी परतला. हे तिन्ही फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर, कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्लाह ओमरजईने मिळून शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. यादरम्यान ओमरजईने ५० धावा केल्या. तर हशमतुल्ला शाहिदीने शेवटपर्यंत फलंदाजी करुन आपलं शतक पूर्ण केलं. दरम्यान अफगाणिस्तानचा डाव २१८ धावांवर आटोपला.

प्रसिध कृष्णाची दमदार गोलंदाजी

चेन्नईच्या उकाड्यात प्रसिध कृष्णाने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. सुरुवातीचे ३ विकेट्स प्रसिध कृष्णाने मिळवून दिले. त्याने या डावात गोलंदाजी करताना ८.२ षटकात अवघ्या २३ धावा खर्च करुन ५ गडी बाद केले. तर हर्ष दुबे, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.