Yashasvi Jaiswal Record: गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीचा नजारा पाहायला मिळाला. यासह यशस्वी जैस्वालनेही दमदार फलंदाजी केली. वैभव १४ चेंडूत ३९ धावा करून माघारी परतला. तर यशस्वीने शेवटच्या चेंडूपर्यंत किल्ला लढवला. त्याने नाबाद ७७ धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्सने ११ षटकात १५० धावा केल्या. दरम्यान अर्धशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं होतं. राजस्थान रॉयल्स संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. या युवा फलंदाजांच्या जोडीने मुंबई इंडियन्सच्या अनुभवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यशस्वी जैस्वालने अवघ्या ३२ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार खेचले. यादरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जैस्वालने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १०० षटकारांचा पल्ला गाठणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी जोस बटलर, संजू सॅमसन आणि शेन वॉटसन यांनी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १०० षटकार मारण्याचा कारनामा केला होता.

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

संजू सॅमसन -१९२ षटकार
जोस बटलर- १३५ षटकार
शेन वॉटसन- १०९ षटकार
यशस्वी जैस्वाल- १०० षटकार

पावसामुळे हा सामना उशिराने सुरु झाला होता. त्यामुळे षटकं कमी करण्यात आली. ११-११ षटकांच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. यादरम्यान दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. वैभवने ३९ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने नाबाद ७७ धावा केल्या. कर्णधार रियान परागने २० धावांचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्सने ११ षटकांअखेर १५० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले. रायन रिकल्टन अवघ्या ८, तर रोहित शर्मा ५ धावा करत माघारी परतला. सूर्यकुमार यादव ६, तिलक वर्मा १४ आणि हार्दिक पंड्या ९ धावा करून माघारी परतला. नमन धीरने २५ आणि शेरफेन रुदरफोर्डने २५ धावा केल्या. मुंबईला हा सामना २७ धावांनी गमवावा लागला.