डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी रचल्यानंतर यशस्वी जैस्वालसाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे उघडले. कसोटी संघात सलामीवीर म्हणून स्थान पक्कं केलेल्या यशस्वीसाठी वनडे आणि टी२० संघातली जागा पक्की झालेली नाही. प्रचंड अशा चुरशीमुळे यशस्वी गेली काही वर्ष वनडे आणि टी२० संघात राखीव किंवा रिझर्व्ह खेळाडूंच्या यादीत दिसतो. विकेटकीपिंगचं तंत्र अवलंबल्यास कदाचित संघात स्थान पक्कं मिळू शकतं असा यशस्वीचा विचार असावा. कारण यशस्वी अलीकडे विकेटकीपिंगचा सराव करताना दिसतो आहे. मुंबई संघाचा कर्णधार सिद्धेश लाडने यासंदर्भात माहिती दिली. रणजी करंडक स्पर्धेचा नवा कोरा हंगाम काही दिवसात सुरू होतो आहे. ४२ जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबई संघाच्या सलामीच्या लढतीपूर्वी सिद्धेशने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यशस्वी विकेटकीपिंगचा सराव करतो आहे हे खरं आहे. त्याला मुंबईसाठी आणि कदाचित भविष्यात भारतासाठी विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारायची असावी असं सिद्धेश लाड म्हणाला. यशस्वीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या रीलमध्ये तो विकेटकीपिंगचा सराव करतो आहे. यशस्वीबरोबर यासंदर्भात बोलणं झालेलं नाही त्यामुळे मला नक्की त्याच्या मनात काय आहे ते ठाऊक नाही असंही सिद्धेशने स्पष्ट केलं.

यशस्वी भारतासाठी ६ वनडे आणि २३ टी२० सामने खेळला आहे. वनडेत रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल सलामीला येत असल्यामुळे यशस्वीसाठी जागा नाही. टी२० संघात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी हे तिघेही उत्तम खेळत असल्यामुळे या संघातही यशस्वीला जागा नाहीये. कसोटी संघात यशस्वीने सलामीवीर म्हणून स्थान पक्कं केलं आहे. यशस्वीने ३१ कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व करताना ४७.४९च्या सरासरीने २६१२ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

यशस्वीने २०२३ मध्ये भारतासाठी टी२० पदार्पण केलं तर गेल्या वर्षी वनडेत पहिला सामना खेळला. मात्र प्रचंड अशा स्पर्धेमुळे यशस्वीला या दोन्ही संघात स्थान पक्कं करता आलेलं नाही. विकेटकीपिंगचं कौशल्य अंगी बाणवलं तर विचार होऊ शकतो. सद्यस्थितीत संयमी फलंदाज केएल राहुल वनडेत विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळतो. राहुल ही जबाबदारी हाताळत असल्यामुळे संघाला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येतो. याआधी राहुल द्रविडनेही विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली होती.

यशस्वी रणजी स्पर्धेतल्या मुंबईच्या पहिल्या लढतीसाठी उपलब्ध आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा सामना चंदिगढशी होणार आहे. या सामन्यानंतर यशस्वी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रवाना होईल. यशस्वीने स्वत:हून निवडसमितीशी संपर्क साधून या लढतीत खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं कळवलं असं सिद्धेशने सांगितलं. यशस्वीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव मुंबई संघासाठी उपयोगी ठरेल यात शंकाच नाही. दरम्यान दुखापतीमुळे शार्दूल ठाकूर या लढतीत खेळू शकणार नाही.

आयपीएल स्पर्धेत यशस्वी राजस्थान रॉयल्सचा अविभाज्य भाग असून, भविष्यात या संघाच्या नेतृत्वाची धुरा त्याला मिळू शकते. आयपीएल स्पर्धेत ८३ सामन्यात १५२च्या स्ट्राईकरेटने खेळताना यशस्वीने २५९३ धावा केल्या आहेत. २०२० ते २०२६ या कालावधीत यशस्वीने आयपीएल स्पर्धेत २ शतकं आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.