Yashasvi Jaiswal, Shafali Verma served notice for missing dope tests: आयपीएल २०२६ चा थरार सध्या जोरात सुरू आहे. पण या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान, अनेक वादही निर्माण होताना दिसत आहेत. पण आता एक मोठा वाद आता भारतीय क्रिकेटमधून समोर आला असून, तो पहिल्यांदाच उघड झाला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या युवा भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि युवा महिला संघाची सलामीवीर शफाली वर्मा या दोघांना डोप चाचणीत संबंधित नोटीस बजावण्यात आली आहे.

एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेटचे हे दोन्ही स्टार खेळाडू डोप चाचणीसाठी उपलब्ध नव्हते, त्यामुळे बीसीसीआय आणि आयसीसीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) चाचणीसाठी अनुपलब्ध असल्याबद्दल डिसेंबरमध्ये दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली होती. शेफाली आणि यशस्वी या नाडाच्या नोंदणीकृत चाचणी गटात (RTP) समाविष्ट असलेल्या काही भारतीय क्रिकेटपटूंपैकी आहेत.

या गटात समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना दरवर्षी त्यांची ठिकाणे आणि वेळा आगाऊ माहिती देत कळवणं बंधनकारक आहे आणि तसे न केल्यास त्यांना नोटीस बजावली जाते. हे ‘व्हेयरअबाउट क्लॉज’चे उल्लंघन मानले जाते. याच नियमाचं यशस्वी व शेफाली यांनी उल्लंघन केलं आहे.’

नियम काय सांगतो?

नाडाच्या ‘रजिस्टरड टेस्टिंग पूल’मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना स्पर्धेबाहेरील डोप चाचणीसाठी ठराविक वेळ आणि ठिकाणाची माहिती द्यावी लागते. डोपिंग कंट्रोल अधिकारी त्या दिलेल्या वेळेत अचानक येऊन नमुने घेऊ शकतात. मात्र, खेळाडू संबंधित ठिकाणी उपस्थित न आढळल्यास, त्याची नोंद ‘मिस्ड टेस्ट’ म्हणून केली जाते.

नोटिसनुसार, गेल्या वर्षी १७ डिसेंबरला यशस्वी जैस्वालची डोप चाचणी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तर शफाली वर्माची चाचणी ७ नोव्हेंबरला नियोजित होती. दोन्ही वेळा संबंधित खेळाडू त्यांनी दिलेल्या ठिकाणी उपस्थित नव्हते. यानंतर नाडाने अनुक्रमे १८ आणि २० फेब्रुवारी रोजी दोन्ही खेळाडूंकडे स्पष्टीकरण मागितलं. मात्र, कोणाकडूनही उत्तर न मिळाल्याने त्यांच्या नावावर पहिली ‘मिस्ड टेस्ट’ नोंदवण्यात आली.

एकच मिस्ड टेस्ट म्हणजे थेट डोपिंग नियमभंग मानला जात नाही. पण १२ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा अशा प्रकारची चूक झाल्यास तो डोपिंगविरोधी नियमांचा भंग मानला जाऊ शकतो. नाडाच्या सुनावणी समितीसमोर खेळाडूंना समाधानकारक स्पष्टीकरण देता आलं नाही, तर त्यांच्यावर दोन वर्षांपर्यंत बंदी घालण्यात येऊ शकते.

ही घटना दोन्ही खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या काळात समोर आली आहे. यशस्वी जैस्वाल सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असून, त्याचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दुसरीकडे, शफाली वर्मा भारतीय महिला संघाचा भाग असून इंग्लंड आणि वेल्समध्ये १२ जूनपासून सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे.