Yashasvi Jaiswal Sledging Niroshan Dickwella Galle Test: क्रिकेटच्या मैदानावर स्लेजिंग आपण सर्रास पाहतो. स्लेजिंगमुळे फलंदाजांना त्याच्या खेळावर फोकस करणं अवघडं जातं, ज्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतो. खेळाडू अनेकदा प्रतिस्पर्धी संघाला अस्वस्थ करण्यासाठी किंवा त्यांची एकाग्रता भंग करण्यासाठी मानसिक खेळी खेळतात. गॉल कसोटीच्या अंतिम दिवशी नेमकं हेच घडलं; यशस्वी जैस्वालने श्रीलंकेचा फलंदाज निरोशन डिकवेलाला स्लेज केलं आणि ज्यामुळे तो पुढच्या चेंडूवर बाद झाला.

भारतीय संघ गॉल कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाने अखेरीस भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. धनंजय डी सिल्वाला बाद केल्यानंतर निरोशन डिकवेला फलंदाजीला आला. डिकवेलाने पहिल्या डावात संघाचा डाव सावरत ८० धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याला मैदानावर फार काळ टिकू न देणं हे टीम इंडियासाठी महत्त्वाचं होतं आणि त्यात यशस्वी जैस्वालने महत्त्वाची भूमिका बजावली.

खरं तर, जेव्हा श्रीलंकेचा फलंदाज डिकवेला फलंदाजीसाठी आला, तेव्हा यशस्वी जैस्वाल त्याला सतत डिवचत होता. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं ते स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे.

यशस्वी जैस्वाल (स्क्वेअर लेगवरून): चल यार, पहिल्या डावात तू किती शॉट्स मारलेस! आता काहीतरी पाहायला मिळू दे. चल, मार!

निरोशन डिकवेला: काय?

जयस्वाल: हो, मला पाहायचंय. चल, दाखव! तिकडे मार ना (डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने इशारा करत). चल, खेळ मोठे फटके खेळून दाखव

डिकवेला: गरज नाही. आधी मला IPLमध्ये घेऊन जा, मग मारतो.

जैस्वाल: घेऊ, घेऊ. १०० टक्के! चल, एक षटकार मार, मी तुला IPLमध्ये घेऊन जाईन.

डिकवेला: थँक्यू!

यशस्वी जैस्वालच वारंवार तेच बोलणं ऐकून डिकवेा वैतागला आणि त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यातच तो बाद झाला. यापूर्वी डिकवेला स्टंपवरचे चेंडू सोडून देत सावधपणे खेळत होता, पण जैस्वालच्या स्लेजिंगनंतर त्याने मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि बाद झाला. बाद होताच संपूर्ण भारतीय संघाने जल्लोष केला. यशस्वी जैस्वाल आणि निरोशन डिकवेला यांच्यातील हा संवाद ‘स्टंप माईक’मध्ये कैद झाला.

पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात श्रीलंकेने प्रभावी खेळ करत आपली बाजू सावरली. कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि सोनल दिनुषा यांनी अर्धशतकं झळकावली आणि भारतीय फिरकी गोलंदाजीचा खंबीरपणे सामना केला. मात्र, सत्राच्या अखेरीस जडेजाला यश मिळालं; त्याने श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाला ‘शॉर्ट फाईन लेग’वर झेलबाद करून ही भागीदारी तोडली. या विकेटनंतर अनुभवी निरोशन डिकवेला फलंदाजीसाठी मैदानात उतरला; श्रीलंकेच्या फलंदाजांचा हा संघर्ष तो अधिक काळ टिकवून ठेवेल, अशी अपेक्षा होती. पण तोदेखील बाद झाला.

मानव सुथारच्या फिरकीच्या जाळ्यात श्रीलंकेचे खालच्या फळीतील फलंदाज फसले आणि त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मानव सुथारने ७६व्या षटकात ३ विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर त्याने अखेरच्या फलंदाजाला बाद केल्याने श्रीलंकेचा संघ २०६ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारतीय संघाने गॉल कसोटीत १६५ धावांनी शानदार विजय नोंदवला.