Yastika Bhatia Record: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. हा लॉर्ड्सच्या मैदानावर महिलांचा पहिलाच कसोटी सामना आहे. या सामन्यात क्रांती गौड, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने दमदार कामगिरी करून मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. या यादीत आता भारताची यष्टिरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाचं नाव जोडलं गेलं आहे. यास्तिका भाटियाने शतकी खेळी करताच मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर क्रांती गौडने ५ गडी बाद करुन आपलं नाव लॉर्ड्सच्या हॉनर्स बोर्डवर कोरलं होतं. आता या बोर्डवर आणखी एका भारतीय खेळाडूचं नाव कोरलं जाणार आहे. यास्तिका भाटियाने १४५ चेंडूंचा सामना करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. हे लॉर्ड्सवर सुरु असलेल्या महिलांच्या पहिल्या ऐतिहासिक सामन्यातील पहिलंच शतक आहे. यास्तिका भाटिया ही कसोटी क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतकी खेळी करणारी पहिलीच महिला फलंदाज ठरली आहे. यासह तिने लॉर्ड्सवर शतकी खेळी करणाऱ्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे.

यास्तिका भाटियाच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. ती भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना तिसऱ्या आणि चौथ्या डावात सर्वात मोठी खेळी करणारी फलंदाज ठरली आहे. तिने या डावात फलंदाजी करताना ११३ धावांची खेळ केली. या खेळीदरम्यान तिने १४ चौकार खेचले. तिने या रेकॉर्डमध्ये संध्या अगरवालला मागे टाकलं आहे. सध्या अगरवाल यांनी १९८५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात ९८ धावांची खेळी केली होती. त्याआधी १९८४ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ८३ धावांची खेळी केली होती. आता या यादीत यास्तिका भाटिया अव्वल स्थानी आहे.

लॉर्ड्सवर कसोटीत शतकी खेळी करणारे भारतीय फलंदाज (पुरुष आणि महिला क्रिकेटपटू)

दिलीप वेंगसरकर (३)
केएल राहुल (२)
विनू मंकड (१)
सौरव गांगुली (१)
मोहम्मद अझरुद्दीन (१)
गुंडप्पा विश्वनाथ (१)
अजित आगरकर (१)
राहुल द्रविड (१)
अजिंक्य रहाणे (१)
रवी शास्त्री (१)
यास्तिका भाटिया (१)
एकूण- १४