Vaibhav Suryavanshi Records: वैभव सूर्यवंशी, हे नाव २०२५ मध्ये तुफान चर्चेत राहिलं. वर्तमानपत्र, टीव्ही किंवा सोशल मीडिया, पाहाल तिथे वैभव सूर्यवंशीच झळकत होता. क्रिकेटचं मैदान असो की गुगल सर्च, वैभव पहिल्या क्रमांकावर टिकून राहिला. कोणीतरी १४ वर्षांचा पोरगा आहे, खूप मोठे फटके मारतो. हा पोरगा आहे तरी कोण? हे शोधून काढण्यासाठी लोकांनी गुगलवर भरभरून सर्च केलं. गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत तो भारतात पहिला, तर जगात सहाव्या क्रमांकावर राहिला. वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएल पदार्पण करून वेगवान शतक झळकावून दणक्यात सुरूवात करणाऱ्या वैभवने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १९० धावांची खेळी करून वर्षाचा शेवट केला आहे. दरम्यान वाचा वैभवने २०२५ या वर्षात कोणते कोणते विक्रम केले आहेत.

बिहारकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीला आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात स्थान दिलं. राजस्थानने त्याच्यावर १.१ कोटींची विक्रमी बोली लावली. यासह वयाच्या १३ व्या वर्षी लिलावात बोली लागणारा आणि वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत पदार्पण करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता. आयपीएल पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचला होता. यासह तो आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा सर्वात युवा फलंदाज ठरला होता. त्यानंतर गुजरात टायटन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात वैभवने कहरच केला. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने अवघ्या ३५ चेंडूत वेगवान शतक झळकावलं. यासह या स्पर्धेत वेगवान शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.

याआधी भारताचा माजी फलंदाज यूसूफ पठाणच्या नावे देखील ३५ चेंडूत शतक झळकावण्याची नोंद होती. तर सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३० चेंडूत शतक झळकावलं होतं. या खेळीदरम्यान वैभवने ११ षटकार खेचले होते.यासह त्याने एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुरली विजयच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

वैभवने अंडर १९ आशिया कप स्पर्धेत फलंदाजी करताना एकूण षटकार मारले. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रम मोडून काढला. तो एकाच बहूराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज ठरला. यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने९५ चेंडूंचा सामना करत त्याने १७१ धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १४ खणखणीत षटकार मारले होते. यासह अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत तो २० षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला.

वैभव विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बिहार संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. अरूणाचल संघाविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ८४ चेंडूत १९० धावांची खेळी केली. यासह तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. या खेळीदरम्यान त्याने १५ षटकार मारले.