२०२५ आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामना केवळ क्रिकेटपुरताच मर्यादित राहिला नव्हता. नाणेफेकपासून ते शेवटच्या षटकापर्यंत, या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हाय-व्होल्टेज लढतीतील वाद, मैदानावरील शाब्दिक संघर्ष आणि राजकीय तणावामुळे अधिकच गाजली. स्पर्धेदरम्यान हस्तांदोलनावरून झालेले वाद, स्लेजिंग, शिस्तभंगाची कारवाई व दंड, तसेच स्पर्धेतील बहिष्काराच्या धमक्यांमुळे आशिया चषक स्पर्धा अधिक गाजली. मैदानावरील कामगिरी आणि वाद याची सोशल मीडियावरील खूपच चर्चा झाली.
भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये आशिया चषक २०२५ मध्ये ३ सामने खेळवले गेले. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आणि स्पर्धाही आपल्या नावे केली. पण सामन्यांमधील वाद मात्र शिगेला पोहोचले होते. भारत-पाकिस्तान सामन्यांमधील झालेले ५ वाद कोणते होते पाहूया.
भारत आणि पाकिस्तान आशिया चषक सामन्यांमधील वाद
१. हस्तांदोलनास नकार
गट टप्प्यातील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानच या वादांना सुरूवात झाली. नाणेफेकीवेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाला हस्तांदोलन करणं टाळलं, इतकंच काय तर त्याच्याकडे नजरही फिरवली नाही. सामना संपल्यानंतरही भारताचा संपूर्ण संघ ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि त्यांनी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला.
या घटनेवर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं, “भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण असतानाही आम्ही एकमेकांशी हस्तांदोलन केलं आहे.” या प्रकारानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत तक्रार दाखल केली. परिणामी, दोन्ही संघांतील काही खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.

२. भारत-पाकिस्तान संघांच्या खेळाडूंचे मैदानावरील वाद
सुपर फोर टप्प्यातील भारत-पाकिस्तान सामन्यात तणाव शिगेला पोहोचला. या सामन्यात पाकिस्तानचे हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी भारतीय चाहत्यांच्या दिशेने इशारा केल्याने वाद निर्माण झाला. हारिस रौफने केलेला “६-०” चा इशारा, तर साहिबजादा फरहानचं गोळीबार करण्याचं सेलिब्रेशन हे मुद्दाम केलेलं कृत्य असल्याचं मानलं गेलं. या प्रकारांमुळे दोन्ही खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफनेही नाराजी व्यक्त करत, खेळाडूंनी वाद न वाढवता केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावं, असं स्पष्ट केलं.
३. आयसीसी मॅच रेफरी पायक्रॉफ्ट वाद आणि पाकिस्तानची बहिष्काराची धमकी
२०२५ आशिया चषकादरम्यान आयसीसीचे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याशी संबंधित मोठा वाद निर्माण झाला, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढला. गट टप्प्यातील दोन्ही देशांमधील सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी नाणेफेकीवेळी हस्तांदोलन टाळलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हा निर्णय पायक्रॉफ्ट यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला होता. मात्र, भारताच्या विजयानंतर भारतीय संघाने सामन्यानंतरही नेहमीप्रमाणे हस्तांदोलन न करता थेट मैदान सोडलं. यामुळे पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अधिकृत तक्रार दाखल केली, तर या वादामुळे स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकीही पाकिस्तानकडून देण्यात आली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या प्रकरणानंतर आक्रमक भूमिका घेतली. पीसीबीने उर्वरित स्पर्धेतून आयसीसी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली. ही मागणी मान्य न झाल्यास, युएईविरुद्धचा आगामी सामना खेळण्यास नकार देण्याची धमकी पाकिस्तानने दिली. पण पायक्रॉफ्ट यांच्यासह बैठक घेण्यात आल्यानंतर संघ युएईविरूद्ध उशिरा सामना खेळण्यासाठी उतरला. या बहिष्काराच्या धमकीमुळे सामना तब्बल एक तासाहून अधिक उशिरा सुरू झाला. निर्णय होईपर्यंत पाकिस्तानचा संघ हॉटेलमध्येच थांबून राहिला होता, ज्यामुळे स्पर्धेतील तणाव आणखी वाढला.
४. आयसीसीची शिस्तभंगात्मक कारवाई
दोन्ही संघांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शिस्तभंगाची कारवाई केली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांच्यावर त्यांच्या मैदानावरील सेलिब्रेशनमुळे आयसीसी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सामन्याच्या मानधनाच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला. या कारवाईद्वारे मैदानावरील शिस्त, खिलाडूवृत्ती आणि समतोल राखण्याचा प्रयत्न आयसीसीकडून करण्यात आला.

५. मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार
भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक २०२५ चं जेतेपद पटकावलं. भारतीय संघाने स्पर्धा जिंकल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया चषक ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. मोहसीन नक्वी हे पीसीबीचे प्रमुख असून ते पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीपदावर आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय संघाने पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन टाळलं होतं आणि त्यामुळेच संघाने मोहसीन नक्वींच्या ट्रॉफी घेण्यासही नकार दिला.
मोहसीन नक्वींनी मात्र मीच ट्रॉफी देणार हा हट्ट करत अखेरीस त्यांनी इतर कोणाच्या हस्ते भारताला ट्रॉफी देऊ दिली नाही. भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय विजयाचं सेलिब्रेशन केलं. अद्यापदेखील भारतीय संघाला आशिया चषकाची ट्रॉफी दिली आहे.
