लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त आणि महाराष्ट्र केसरी विजेता नरसिंग यादव यांची आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा लास व्हेगास (अमेरिका) येथे ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.
भारतीय कुस्ती महासंघातर्फे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. ७४ किलो गटांत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सुशील कुमारने दुखापतीमुळे माघार घेतली असल्यामुळे त्याच्याऐवजी नरसिंगला संधी मिळाली आहे. त्याने चाचणीत प्रवीण राणावर ६-५ अशा गुणांनी मात केली.
योगेश्वरला ६५ किलो फ्रीस्टाइल गटातील पहिल्या लढतीत पुढे चाल मिळाली, मात्र नंतरच्या लढतीत त्याला अमितकुमार धानखरविरुद्ध विजय मिळवताना झुंजावे लागले. सहा मिनिटे चाललेली ही लढत ६-३ अशी जिंकून योगेश्वरने जागतिक स्पर्धेतील स्थान निश्चित केले.
चाचणीमधील ५७ किलो गटांत अमितकुमारने संदीप तोमरला ३-२ असे हरविले. सुरुवातीस तो १-२ असा पिछाडीवर होता. नरेश कुमार (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) व सुमितकुमार (१२५ किलो) यांनीही भारतीय संघात स्थान मिळवले.
सोनू (६१ किलो) व अरुण (७० किलो) यांचीही जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मात्र त्यांच्या गटांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही. सोनू याने प्रदीप कुमार याला ३-२ असे पराभूत केले तर अरुण याला मनोज कुमार याच्याकडून पुढे चाल मिळाली. नरेश कुमारने गोपाळ यादव याचा ७-३ असा पराभव केला तर खत्रीने सत्यव्रत काडियन याचा ६-० असा दारुण पराभव केला. सुमितने कृष्णन याला २-० असे हरवले.

ग्रीकोरोमन विभागाचे निकाल-
(विजयी स्पर्धक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत)- ५९ किलो-रवींदर सिंग वि.वि. गौरव शर्मा, ६६ किलो-दीपक कुमार वि.वि. अनिल कुमार, ७१ किलो-महंमद रफीक वि.वि. के.के.यादव. ७५ किलो-गुरप्रीत सिंग वि.वि. रजबीर चिकारा, ८० किलो-हरप्रीत सिंग वि. वि. रविंदर खत्री, ८५ किलो-मनोज कुमार वि. वि. रामबीर, ९८ किलो-हरदीप वि. वि. भीम कुमार, १३० किलो-नवीन कुमार वि. वि. सोनू सिंग.

‘रिओ अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा’
नवी दिल्ली : दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमारने २०१६ मध्ये होणारी रिओ ऑलिम्पिक स्पर्धा कारकीर्दीतील अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे स्पष्ट केले. ‘‘रिओ येथे २०१६ मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असेल, परंतु अद्याप निवृत्तीबाबत विचार केलेला नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष हे रिओ ऑलिम्पिकमध्ये असून त्यासाठी कठोर मेहनत घेत आहे,’’ असे मत सुशीलने व्यक्त केले.
दुखापतीमुळे सुशीलला आगामी जागतिक कुस्ती स्पध्रेतून माघार घ्यावी लागली आहे. मात्र, आपले गुरू सत्पाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेईल, असे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘‘गुरू सत्पाल यांनी रिओ ऑलिम्पिकनंतर निर्णय घेऊ, असे मला सांगितले आणि ते जे काही सांगतील, त्याचे मी पालन करीन.’’