ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याला गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागणार आहे. जागतिक स्पर्धा बुडापेस्ट (हंगेरी) येथे १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. योगेश्वरच्या गुडघ्यावर २००९ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्याने गतवर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक खेचून आणले होते. ‘‘जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक झालो होतो. या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी मी कसून तयारी केली होती. मात्र पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे. या संदर्भात मी वैद्यकीय तज्ज्ञांकडे गेलो होतो. मात्र त्यांनी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच मला आफ्रिकेत शस्त्रक्रियेसाठी जावे लागणार आहे,’’ असे योगेश्वरने सांगितले.