सध्या सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त सहभागी होऊ शकला नाही, परंतु सध्या मानसिकतेतील बदलांमुळेच भारतीय कुस्तीपटूंना सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळत आहे, असे मात्र त्याने आवर्जून सांगितले.
योगेश्वर म्हणाला, ‘‘भारतीय खेळाडू फक्त प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सहभागी होण्यावरच समाधान मानत नाहीत. भारतीय कुस्तीपटूंची यशासाठीची भूक वाढू लागली आहे. भारताचे युवा कुस्तीपटू सध्या चांगली कामगिरी करून आपली छाप पाडत आहेत. खेळाडूंची मनोवृत्ती आता बदलू लागली आहे. त्यांना आता विश्व अजिंक्यपद किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदक खुणावू लागले आहे. पूर्वी बरेचसे भारतीय खेळाडू आपल्या नावासमोर आंतरराष्ट्रीय किंवा ऑलिम्पिकपटू असा शिक्का लावण्यात धन्यता मानायचे.’’
‘‘सुशील कुमारचे लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक आणि माझे कांस्यपदक यामुळे देशातील कुस्तीला चालना मिळाली आहे. बऱ्याचशा युवा कुस्तीगीरांना आमच्या पदकामुळे प्रेरणा मिळाली आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये पदक जिंकण्याचा त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. २०१६ आणि २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारत अधिक पदके जिंकेल, अशी आशा आहे. सुशील आणि माझ्यानंतर युवा कुस्तीगीर पदकाची परंपरा कायम राखतील, अशी आशा आहे. अमित आणि बजरंग यांना २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा आहे. बजरंग २०१० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो,’’ असेही योगेश्वरने सांगितले.
योगेश्वर सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. दुखापतीबाबत तो म्हणाला, ‘‘नोव्हेंबरमध्ये मी पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत आहे. गुडघ्याची दुखापत पुन्हा उद्भवू नये, यासाठी मी नोव्हेंबरमध्ये कमी प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये खेळणार आहे. रिओ ऑलिम्पिक हे माझे पुढील उद्दिष्ट आहे.’’