सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्स संघात असतानाही अर्जुन तेंडुलकर फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली त्याने पदार्पण केलं होतं. पण आता २०२६ हंगामापूर्वी मुंबईने त्याला रिलीज केलं आणि लखनौने त्याला संघात घेतलं. यानंतर आर अश्विन म्हणाला होता की, अर्जुनला लखनौ खेळण्याची संधीच देणार नाही, तर चर्चा कशाला. यावर आता योगराज सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अश्विनने म्हटलं होतं की, लखनौ सुपरजायंट्स या हंगामात अर्जुन तेंडुलकरला एकाही सामन्यात खेळवणार नाहीत, कारण त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांचा एक संपूर्ण संघ आहे. अर्जुनचे माजी प्रशिक्षक योगराज सिंग यांनी अश्विनच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अश्विनचे ​​वक्तव्य मूर्खपणाचे असल्याचे सांगत फेटाळून लावलं आणि म्हटलं की, एखाद्या व्यक्तीबद्दल काय बोलावं हे त्याला कळायला हवं. जर अर्जुन तेंडुलकर त्याच्यासोबत ६ महिने राहिला, तर तो त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज बनवेल आणि तसं न झाल्यास, तो स्वत:ची दाढी काढून टाकतील.

योगराज सिंग यांनी अश्विनला प्रत्युत्तर देताना म्हटलं, “अश्विन निरर्थक काहीही बोलतोय. तो कोणीही असो, एखाद्याबद्दल काय बोलायचं हे त्याला कळायला हवं. तो टीव्हीवर येऊन म्हणतोय, ‘तो हे करू शकत नाही, तो ते करू शकत नाही.’ कोण आहेस तू?”

पंजाबच्या या माजी क्रिकेटपटूचा अर्जुनच्या क्षमतेवर खूप पूर्वीपासून विश्वास होता, कारण त्यांनी २०२२ मध्ये त्याला प्रशिक्षण दिलं होतं. केवळ १२ दिवसांच्या प्रशिक्षणात, अर्जुनने पदार्पणातच शतक झळकावलं. योगराज यांनी त्याला पूर्ण एक वर्ष मार्गदर्शन देण्यासाठी आग्रह धरला होता, पण ते कधीच शक्य झालं नाही. त्यांनी एका तांत्रिक समस्येकडेही लक्ष वेधलं, ज्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झालं आहे असे त्यांना वाटते. “त्याला (अर्जुनला) पाठीच्या कण्याचा त्रास होता आणि त्याचा हात ४५ अंशातून येत होता,” असे ते म्हणाले.

योगराज पुढे म्हणाले, “मी अर्जुन तेंडुलकरला आव्हान देतो की, जर त्याने माझ्यासोबत सहा महिने घालवले, तर तो जगातील प्रत्येक फलंदाजाला मागे टाकेल. जर त्याने तसं केलं नाही, तर मी माझी दाढी काढेन. मी माझं काम असंच करतो.”