Yograj Singh on Rohit-Virat and Dhoni: आयपीएल २०२६ मध्ये आज ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्स संघाने सलामीचा सामना खेळणार आहे. हा सामना गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध भिडणार आहे. संघाचा स्टार खेळाडू कॅप्टन कुल एम एस धोनी सामना खेळणार नाहीये, त्याच्या पायाच्या पोटरीला दुखापत झाल्याने तो काही सामन्यांमध्ये खेळणार नाहीये. धोनीच्या फिटनेसबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे त्यांच्या विचित्र वक्तव्यांमुळे वादात सापडतात. आता त्यांनी रोहित शर्मा व विराट कोहलीबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तर धोनीचं कौतुक करणाऱ्या वाक्यांनी चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. युवराज सिंगचं करियर लवकर संपण्यासाठी धोनीला कारणीभूत ठरत योगराज सिंग त्याला सातत्याने घालून पाडून बोलत असतात. पण यावेळेस निवृत्तीच्या मुद्द्यावरून त्यांनी कौतुक केलं आहे.
‘इन्साइड स्पोर्ट्स’शी बोलताना योगराज सिंग हे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीवर चर्चा करत होते. तेव्हा त्यांनी एम.एस. धोनीचे उदाहरण देऊन त्याचं कौतुक केलं. त्यांनी धोनीच्या दीर्घकाळ खेळण्याची, शिस्तीची आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, खेळाडूचा खेळ आणि निवृत्त होण्याचा त्याचा स्वतःचा निर्णय हा त्यांच्या अधिकारात येतो; वय आणि निवृत्ती यांचा कोणताही संबंध जोडला जाऊ नये.
रोहित शर्मा विराट कोहलीबाबत योगराज सिंग म्हणाले, “रोहित शर्मा आणि विराट कोहली हे अजूनही तरुण क्रिकेटपटू आहेत आणि त्यांनी क्रिकेट सोडण्याचा विचार करू नये. रोहित-विराटने निवृत्ती घेतली याची लाज वाटायला हवी. जगाला दाखवा की तुम्हीच सर्वोत्तम आहात आणि तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. जरी तुमचं वय पन्नास वर्षं झालं आणि तरीही तुम्ही द्विशतक करत असाल, तर कुणीही तुम्हाला संघातून बाहेर काढू शकणार नाही. त्यामुळे आपल्या देशात वय हा मुद्दा खूपच वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहिला जातो.”
धोनीबद्दल योगराज सिंग म्हणाले, “नक्कीच, मी त्याला सलाम करतो. तो अजूनही खेळत आहे आणि त्याने पुढील १० वर्षेही खेळत राहायला हवं. कारण त्याने आपला फिटनेस सिद्ध केला आहे. त्या माणसाचं शिस्तबद्ध जीवन आणि समर्पण कमाल आहे. आजही मी त्याच्या फोरआर्म्सकडे (मनगटाच्या स्नायूंवर) पाहतो, किती जबरदस्त व्यक्ती माणूस आहे तो! त्यांना निवृत्ती घ्यायला सांगणारे हे लोक कोण आहेत? जोपर्यंत क्रिकेटचा प्रश्न आहे, त्याला सलाम करतो मी…”, असं योगराज सिंग म्हणाले.
धोनी यंदाच्या हंगामातील सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. धोनीच्या पायाच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे तो सुरूवातीचे दोन आठवडे चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार नाही, ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत देण्यात आली आहे. तर विराट कोहलीचा आरसीबी संघ स्पर्धेतील सलामीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध २८ मार्चला खेळणार आहे. तर रोहित शर्माचा मुंबई संघ केकेआरविरूद्ध सामन्याने मोहिमेला सुरूवात करेल.
