अफगाणिस्तानचा आहे म्हणजे मला इंग्रजी येत नाही असं समजू नकोस असं जगप्रसिद्ध फिरकीपटू रशीद खानने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. अफगाणिस्तानने नुकतीच भारतात भारताविरुद्ध मालिका आयोजित केली. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या मालिकेच्या निमित्ताने भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी ‘बैठ अँड बोल’ या पॉडकास्टमध्ये रशीदशी संवाद साधला. २८वर्षीय रशीद हा आयपीएलमधल्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तो जगभरात टी२० लीग खेळतो. ५५० टी२० सामन्यात रशीदच्या नावावर ७४० विकेट्स आहेत. त्याने ६ टेस्ट, १२३ वनडे आणि ११८ टी२० सामन्यात अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. रशीद अफगाणिस्तानचा माजी कर्णधारदेखील आहे. जगभरातल्या २४ टी२० संघांचा तो भाग आहे.

‘तू जगभरात क्रिकेट खेळतोस. असंख्य लीगचा तू अविभाज्य भाग आहेस. वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांबरोबर तुझं बोलणं होतं. इंग्रजीचं शिक्षण घेतलंस त्याचा तुला फायदा होतो का’? असं चोप्रा यांनी विचारलं. त्यावर रशीद म्हणाला, ‘मी जगभरात अनेक ठिकाणी खेळतो हे खरं आहे. पण मी इंग्रजी शिकलो, वेळ देऊन शिकलो याचा अभिमान वाटला अशी एक घटना घडली होती. २०२२-२३ मध्ये मी अमेरिकेला जाणार होतो. व्हिसा घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांनी माझा पासपोर्ट पाहिला. तो अर्थातच अफगाणिस्तानचा होता. आमचं बोलणं सुरू झालं. त्यांनी विचारलं तू कुठचा आहेस? मी म्हटलं अफगाणिस्तानचा. त्यावर तो पटकन म्हणाला, मग तुला इतकं चांगलं इंग्रजी कसं येतं? मी विचारलं, म्हणजे काय? मी अफगाणिस्तानचा आहे म्हणजे मला इंग्रजी येत नाही असा अर्थ होत नाही. मी कदाचित तुझ्यापेक्षा जास्त चांगलं इंग्रजी बोलू शकेन. तेव्हा मला वाटलं इंग्रजी शिकलो ते चांगलं केलं’.

‘मी अफगाणिस्तान वाढलो. तिथेच इंग्रजी शिकलो. हे सांगितल्यावर त्याने मला पाहिलं. कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्याने मला जाऊ दिलं. उद्या येऊन व्हिसा घेऊन जा’, असं म्हणाला. ‘अफगाणिस्तानचा आहे म्हणजे मी अडाणी आहे, निरक्षर आहे असं नाहीये. त्याने वेगळ्या पद्धतीने इंग्रजी बोलून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मी त्याला म्हटलं, मला तुझी भाषा व्यवस्थित समजते आहे, मला काहीच अडचण नाही’.

‘मी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतो आहे. त्यामुळे ते करताना जगाची जी भाषा आहे ती मला यायला हवी असं वाटतं. आता मी जिथे खेळायला जातो तिथे इंग्रजी बोलतो. विविध लोकांशी संवाद साधता येतो, त्यांची संस्कृती समजून घेता येते. इंग्रजीमुळे माझं क्रिकेट वृद्धिंगत झालं आहे हा सगळ्यात मोठा फायदा झाला आहे. इंग्रजी अन्य कुणाची भाषा आहे, मी ती शिकायला नको असं काहीच नव्हतं. मी इंग्रजी शिकलो, त्यामुळेच इथवर वाटचाल करू शकलो आहे. इंग्रजी येत असल्यामुळे माझा क्रिकेट प्रवास सुकर झाला’, असं रशीदने सांगितलं.

‘विदेशी प्रशिक्षकांशी सविस्तर बोलता येतं. डावपेच आखता येतात. अनेक युवा खेळाडूंना सुरुवातीला इंग्रजीत बोलताना अडचण जाणवते. अशावेळी मी भाषांतरकार म्हणून काम करतो. पण प्रत्येकवेळी भाषांतराने होत नाही. इंग्रजी येत असेल तर समोरच्याचं म्हणणं समजून घेता येतं. मूळ बोलणं आणि भाषांतरित जे समोर येतं त्यात फरक पडतो. माझ्यासाठी कदाचित भाषांतरकार उपलब्ध झालाही असता पण लहेजा, संदर्भ कळले नसते’, असं रशीद सांगतो.

‘मी इंग्रजीसाठी १४व्या वर्षी जवळपास सव्वा वर्ष दिलं याचं आता समाधान वाटतं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कुठेही जातो तिथे मला उपयोगी पडतं. त्यांनाही आश्चर्य वाटतं की मला इतकं नीट इंग्रजी कसं येतं. मी त्यांना सांगतो, इंग्रजी शिकणं ही काही अवघड गोष्ट नाही. आम्हालाही जमू शकतं’, असं रशीद हसतहसत सांगतो.