आयपीएल स्पर्धेत यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनच्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. लॉकीने कुटुंबाला प्राधान्य देत हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. कुटुंबाला वेळ देण्यात काहीच चुकीचं नाही पण जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेसाठी करारबद्ध होता तेव्हा संपूर्ण हंगाम खेळण्याची कटिबद्धता असते. ती तोडणं योग्य नाही असं चोप्रा यांचं म्हणणं आहे.

‘मी लॉकी फर्ग्युसनचा विचार करतो आहे. लॉकीचा विषय गंभीर आहे. तो दुखापतग्रस्त आहे का? नाही. मला नक्की माहिती नाही पण नसावा. नंतरच्या सात सामन्यांसाठी उपलब्ध असेन असं लॉकीने पंजाब किंग्ज संघव्यवस्थापनाला कळवलं आहे. कुटुंबाबरोबर वेळ व्यतीत करायचा आहे असं त्याने कळवलं आहे. पंजाब किंग्ज संघाने लॉकीला बेस प्राईज अर्थात २ कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं होतं. तो आता न्यूझीलंडसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्यी टी२० मालिकेत खेळत आहे. त्यानंतर तो विश्रांती घेणार आहे. यात काहीच वावगं नाही. या निर्णयावरून मी त्याला जोखत नाहीये. तो विषयच नाही. मलाही माझ्या घरच्यांबरोबर वेळ घालवायला आवडतं. कोणी मला सांगितलं तर मीही सुट्टी घेऊन घरच्यांना वेळ देईन. घरचे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. पण जेव्हा एखाद्या व्यावसायिक स्पर्धेसाठी तुम्ही करारबद्ध होता तेव्हा त्याप्रति १०० टक्के देणं अपेक्षित असतं. तो तुमच्या रोजोरोटीचा विषय आहे. आयपीएल ही दोन महिने चालणारी स्पर्धा आहे. सरासरी प्रत्येक संघ १४ सामने खेळतो. लॉकी पहिल्या टप्प्यासाठी उपलब्ध नाहीये. पंजाब किंग्जने तो असेल हे लक्षात घेऊन रणनीती आखली असेल. आता त्यांना त्यात बदल करावा लागेल. सात सामन्यांपर्यंत बाद फेरीचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. पंजाबला बाद फेरी गाठून देण्यात लॉकीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली असती. मात्र आता तो ७ सामन्यांनंतर येणार आहे. तोपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल. हे योग्य नाही हे संघालाही कळायला हवं. तुम्ही सात सामने झाल्यावर याल. प्रो रेटा पद्धतीने १ कोटी रुपये घेऊन निघून जाल. याला काय अर्थ आहे? लॉकी नसताना पंजाबला आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या वेगवान गोलंदाजीची उणीव भासेल. ती कोण भरून काढणार’? असं चोप्रा यांनी म्हटलं आहे.

लॉकी आणि त्याच्या पत्नीला नुकतंच बाळ झालं. टी२० वर्ल्डकप काळात तो पत्नीबरोबर असण्यासाठी मायदेशी गेला होता. मात्र अवघ्या २ दिवसात तो भारतात परतला. ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका झाल्यावर मी पत्नी आणि बाळाला वेळ देईन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर पाहता, कधी विश्रांती घ्यायची हा निर्णय घेणं कठीण आहे. पण मला असं वाटतं हीच योग्य वेळ आहे कारण बाळ लहान आहे. घरच्यांना आता माझी आवश्यकता आहे’, असं लॉकीने सांगितलं.

भन्नाट वेग आणि अचूकता हे ३४वर्षीय लॉकीच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. ५४ टी२० सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करताना लॉकीने ७६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल स्पर्धेत लॉकी पाच संघांसाठी खेळला असून, त्याच्या नावावर ५१ विकेट्स आहेत.