Jhulan Goswami On Womens Premier League 2026: आजपासून महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईचा संघ गेल्या हंगामातील चॅम्पियन संघ आहे. तर २०२४ मध्ये झालेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यामुळे दोन्ही चॅम्पियन संघ पहिल्याच लढतीत आमनेसामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाच्या मेटॉंर झुलन गोस्वामी यांनी युवा खेळाडूंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ आधीपासूनच युवा खेळाडूंना घडविण्यासाठी ओळखला जातो. इतर संघ गाजलेले खेळाडू संघात घेतात पण मुंबई इंडियन्स संघ अशा खेळाडूंना संधी देतो जे पुढे जाऊन मैदान गाजवतात. यावेळी देखील महिलांच्या संघात अशा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, जे मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी करू शकतात.
कोणता खेळाडू आगामी हंगाम गाजवणार? याबाबत बोलताना झुलन गोस्वामी म्हणाल्या, “असं एका खेळाडूचं नाव घेता येणार नाही. कारण मुंबई इंडियन्स हे खेळाडूंना घडवण्याचं काम करत आहे. इथे देशांतर्गत खेळत खेळणाऱ्या खेळाडूंना आव्हानाला समोर कसं जायचं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत कसं खेळायचं हे शिकवलं जातं. आम्ही त्यांना कुटुंबासारखी वागणूक देतो. संघाला सामने कसे जिंकून द्यायचे हे आम्ही त्यांना शिकवतो. खेळाडूंमध्ये संघाला विजय मिळवून देण्याची मानसिकता असणं खूप गरजेचं आहे.”
मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेसाठी जी कमलिनीला रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता. तर सजना सजीवन, साईका इशाक आणि संस्कृती गुप्ता या युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. आता कोणती खेळाडू आगामी हंगाम गाजवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
