नवी दिल्ली : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील दुहेरीच्या पहिल्या सामन्यादरम्यान पायाला झालेल्या दुखापतीमुळे भारताच्या युकी भांबरीच्या सोल येथे दक्षिण कोरियाविरुद्ध होणार्या डेव्हिस चषक लढतीला मुकावे लागू शकेल. ही लढत १८-१९ सप्टेंबरला होणार आहे. भांबरी कोरिया येथे रवाना झालेल्या पहिल्या टप्प्यातील खेळाडूंमध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे त्याच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत आठ संघांच्या ‘एलिट’ डेव्हिस चषक अंतिम टप्प्यात आपली जागा निश्चित करेल. भांबरीने आपली दुखापत गंभीर नसल्याचे म्हटले आहे.
‘‘अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या सामन्याआधी सरावादरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली होती. ही गंभीर दुखापत नाही. मी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठीची वेळ निश्चित नाही. मला अजूनही वेदना होत आहे. पुढे काय होईल आताच सांगू शकत नाही. मी आशियाई क्रीडा स्पर्धेत निश्चित सहभाग नोंदवेन. मात्र, डेव्हिस चषकात खेळणार की नाही हे पाहावे लागेल,’’ असे भांबरी म्हणाला.
भांबरी वेळेत तंदुरुस्त न झाल्यास भारताला दुहेरीसाठी पर्यायांचा विचार करावा लागेल. त्याच्या अनुपस्थितीत एन श्रीराम बालाजी आणि दक्षिणेश्वर सुरेश दुहेरीत खेळू शकतात. सिद्धार्थ रावत आणि अर्णव पापरकर राखीव खेळाडू आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (एआयटीए) सूत्रांनुसार, कर्णधार रोहित राजपाल यांच्या विनंतीनुसार अनिरुद्ध चंद्रशेखरला संघासह येण्यास सांगण्यात आले आहे. त्याच्याकडे कोरियाचा व्हिसा देखील आहे. ‘एआयटीए’ने निकी पूनाचा याच्या व्हिसासाठी देखील अर्ज दिला आहे.
