आयपीएल आणि रणजी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर भारताचा तडफदार फलंदाज युसूफ पठाणला भारतीय संघाचे वेध लागले आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळेल, अशी युसूफला आशा आहे. आयपीएलमध्ये युसूफ कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असला, तरी मार्च २०१२ नंतर त्याला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आलेला नाही. पण गेल्या हंगामात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळेल, असे वाटते. ‘‘यावर्षी रणजी स्पर्धेमध्ये माझ्याकडून चांगली कामगिरी झाली. तुम्ही जर ट्वेन्टी-२० क्रिकेटबद्दल बोलत असाल, आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना मी चांगल्या खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे मला अशी आशा आहे की, आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात मला संघात स्थान मिळेल,’’ असे युसूफ म्हणाला.