येत्या शुक्रवारपासून सुरू होणारी बोर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिका ही रंगतदार होईल, असे मत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंगने व्यक्त केले आहे. युवीला या मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. परंतु यावेळी पंजाबचा आपला सहकारी हरभजन सिंगचा कसोटी संघात समावेश झाल्याचे त्याने स्वागत केले आहे. ऑफ-स्पिनर हरभजनला १००वा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे, हा फार मोठा बहुमान आहे, असे युवराज म्हणाला.
‘‘हरभजन हा भारताचा महान गोलंदाज आहे. त्याने आपल्या बॅटनेही संघासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे हरभजनच्या समावेशामुळे मला अतिशय आनंद झाला. तो आगामी मालिकेत चांगली कामगिरी बजावेल, अशी आशा आहे,’’ असे ३१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू युवराजने सांगितले.