Yuvraj Samra Hundred in T20 WC 2026 vs NZ: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १७ फेब्रुवारीला कॅनडा आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात कॅनडाने कमालीची फलंदाजी केली. कॅनडाचा सलामीवीर फलंदाज असलेल्या युवराज सामराने न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात शतक झळकावलं आहे. १९ वर्षीय या भारतीय वंशाच्या फलंदाजाने किवी गोलंदाजांची धुलाई करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या शतकी खेळीसह त्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

कॅनडाच्या युवराज सामराने न्यूझीलंडविरूद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये झळकावलं वादळी शतक

युवराज सामराने फक्त ५८ चेंडूत शतक झळकावलं. तर अखेरच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. युवराज सामराने या सामन्यात ६५ चेंडूत ११ चौकार व ६ षटकारांसह १६८.३३ च्या स्ट्राईक रेटसह ११० धावांची उत्कृष्ट खेळी केली. याह कॅनडाने न्यूझीलंडविरूद्ध २० षटकांत ४ बाद १७३ धावा उभारल्या आहेत.

युवराज सामरा हा टी-२० विश्वचषक इतिहासात शतक करणारा सर्वात तरूण फलंदाज ठरला आहे. युवराज सामरा हा फक्त १९ वर्षांचा आहे आणि अवघ्या १९व्या वर्षी शतक करत विश्वविक्रमाची नोंददेखील आपल्या नावे केली आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात २० वर्षांखालील फलंदाजाने शतक ठोकण्याचा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. युवराज सामरा हा केवळ टी-२० विश्वचषकातच नव्हे तर आयसीसी स्पर्धांमध्येही शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने आयर्लंडचा स्टार फलंदाज पॉल स्टर्लिंगचा विक्रम मोडत ही कामगिरी केली.

युवराज सामराने पाकिस्तानच्या अहमद शहजादचा विश्वविक्रम मोडला, ज्याने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध २२ वर्षे आणि १२७ दिवस वय असताना शतक झळकावलं होतं. आता युवराज समराने अवघ्या १९ वर्षे १४१ दिवस वयाचा असताना शतक झळकावलं.

सामरा फक्त १९ वर्षांचा आहे, पण त्याने कॅनडासाठी ८ एकदिवसीय आणि १६ टी-२० सामने खेळले आहेत आणि त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक म्हणजे गेल्या वर्षी बहामासविरुद्ध त्याने फक्त १५ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं, हा एक राष्ट्रीय विक्रम आहे.

टी-२० विश्वचषकात शतक करणारे सर्वात तरुण खेळाडू

१९ वर्षे १४१ दिवस – युवराज सामरा, कॅनडा विरुद्ध न्यूझीलंड, चेन्नई, २०२६*

२२ वर्षे १२७ दिवस – अहमद शहजाद, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, मिरपूर, २०१४

२३ वर्षे १५६ दिवस – सुरेश रैना, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आयलेट, २०१०

२५ वर्षे ८३ दिवस – अ‍ॅलेक्स हेल्स, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, चॅटोग्राम, २०१४

२५ वर्षे ३२७ दिवस – ग्लेन फिलिप्स, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, सिडनी, २०२२