भारतीय क्रिकेट संघातील अनेक आजी-माजी खेळाडू एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. अशाच खेळाडूंमध्ये युवराजर सिंग, सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग या त्रिकूटचा समावेश होतो. यापैकी, हरभजन सिंग अर्थात ‘भज्जी’चा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे जवळचे मित्र असलेल्या सचिन आणि युवराजने खास पद्धतीने भज्जीला शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावर भज्जीचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

हरभजनच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने भज्जीसोबत घालवलेले खास क्षण दाखवले आहेत. युवराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये अनेक चाहत्यांनी हरभजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराजप्रमाणे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेदेखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवर हरभजनचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ २००१मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या या सामन्यात भज्जीने भारतासाठी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर करून सचिनने हरभजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

३ जुलै १९८० रोजी पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेल्या हरभजन सिंगने आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये अनेक विक्रम केले. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. हरभजनने २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत हरभजन सिंगने हॅट्ट्रिकसह ३२ बळी घेतले होते. या मालिकेत त्याने चार वेळा पाच बळी घेण्याची कामगिरीही केली होती.